Mohan Bhagwat on Trump Tariff: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५०% शुल्कावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले की, 'हे शुल्क भारताच्या वाढत्या प्रभावाच्या भीतीचे परिणाम आहेत.'
भागवत पुढे म्हणतात, ' मनात जर आपलेपणाची भावना असेल तर, सुरक्षेचा प्रश्नच येत नाही. कोणीही आमचा वैरी नाही. दुसरा मोठा झाला, तर माझे काय होईल, ही भीती जगातील इतर देशांच्या मनात आहे. भारत जर मोठा झाला तर आमची स्थिती अशी असेल, आमचे काय होईल, ही भीती जगातील काही देशांच्या मनात असल्यामुळेच त्यांनी आपल्यावर टॅरिफ लागू केला आहे.'
संत तुकारामांचा उल्लेखमोहन भागवत यांनी संत तुकारामांचे उदाहरण देत म्हटले की, 'आपण टीका करतो किंवा प्रशंसा करतो, आपल्याला आपले हित जपावे लागते. तुकारामांच्या हितांमध्ये संपूर्ण जगाचा समावेश होता. पण जेव्हा आपण आपले 'स्व' आपल्या मनात कोंडून ठेवतो, तेव्हा ते भांडणांचे कारण बनते. व्यक्तींपासून राष्ट्रांपर्यंत भांडणांचे हेच मूळ आहे. आम्हाला हवे आहे, मला हवे आहे, अशी भावना निर्माण होते. उर्वरित जगाला जे हवे आहे, त्याचा विचार केला जात नाही,' असेही भागवत म्हणाले.
भारतावर ट्रम्प टॅरिफअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादले. रशियाकडून तेल खरेदी केल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी भारतावरही तब्बल ५० टक्के टॅरिफ लादले आहेत.