उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (ATS) पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरून २८ वर्षीय मोहम्मद तुफैलला अटक केली आहे. तुफैलच्या मोबाईलमध्ये देशविरोधी व्हिडीओ, मेसेजेस आणि छायाचित्रे सापडली असून, तो तब्बल ६०० पाकिस्तानी फोन नंबरांशी नियमित संपर्कात होता, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
तुफैल व्हॉट्सअॅपवर सक्रिय होता आणि तो वारंवार धार्मिक भावना चिथावणारे व्हिडीओ आणि संदेश शेअर करत होता. प्रयागराजमध्ये 2023 मध्ये घडलेल्या बस कंडक्टरवरील कुऱ्हाडीच्या हल्ल्यानंतर तुफैल या घटनेच्या व्हिडीओ क्लिप्स आपल्या ग्रुपवर शेअर करून लोकांमध्ये आक्रोश निर्माण करत होता. पोलीस तपासात त्याने ही कबुली दिली की तो व्हाट्स अॅप स्टेटसवर देशविरोधी मजकूर टाकत असे.
तुफैलला पोलिसांनी अटक केल्यानंतरही त्याच्या कुटुंबीयांनी या प्रकरणावर मौन बाळगले आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, तुफैल फार कमी बोलणारा असून, त्याच्याकडे अनेक वेळा अनोळखी लोक ये-जा करत असल्याचे दिसून आले. हे लोक वाराणसीचे नसल्याचेही स्थानिकांनी स्पष्ट केले.
व्यक्तिगत पार्श्वभूमी आणि कट्टरपंथी संबंधतुफैलचे शिक्षण केवळ सातवीपर्यंत झाले असून, मदरशात झाले आहे. तो विवाहित नाही. लहानपणी त्याचे आई-वडील विभक्त झाले आणि नंतर तो आजीच्या घरी राहत होता. त्याने आधी विणकाम तर, नंतर बांधकाम क्षेत्रात काम केले. तपासात असाही खुलासा झाला आहे की, तो पाकिस्तानातील फैसलाबाद येथील नफीसा नावाच्या महिलेशी संपर्कात होता, जिला तो नेपाळमार्गे भेटवस्तू पाठवत असे. या महिलेला त्याने भारतातील घाट, देशद्रोही मजकूर व व्हिडीओ पाठवले होते.
तहरीक-ए-लब्बैक आणि मौलाना शाद रिझवीशी नातेतुफैल पाकिस्तानातील बंदी घालण्यात आलेल्या तहरीक-ए-लब्बैक संघटनेच्या विचारांनी प्रभावित असून, तो मौलाना शाद रिझवी यांच्या भारतविरोधी व्हिडिओजचा प्रसार करत असे. हे व्हिडीओ भारतातील मुस्लिम तरुणांना कट्टरपंथाकडे वळवण्याचे काम करत होते.
कारवाई आणि पुढील तपास सुरूएटीएसने तुफैलच्या मोबाईल आणि सिमकार्ड्स जप्त केली आहेत, मात्र त्याचा संपर्क कुठकुठे होता, याचा सखोल तपास करण्यासाठी त्याला रिमांडवर घेण्यात येणार आहे. त्याने पूर्व भारतात, विशेषतः सरहिंद व कन्नौज भागात कुठे प्रवास केला, आणि तेथे त्याचे कोणाशी संबंध होते, याचा तपास सुरू आहे.