ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ३० - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या एनडीए सरकारचे भरभरुन कौतुक केले आहे. आता देशात खरोखरच अच्छे दिन येतील असे वाटत असल्याचे अण्णा हजारेंनी म्हटले आहे. मोदींचे कौतुक करतानाच अण्णांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. केजरीवाल हे भरकटले असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली आहे,
अण्णा हजारेंनी शुक्रवारी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखात दिली आहे. यात अण्णांनी मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. 'नवीन सरकारने देशाच्या जनतेसमोर आशेचा किरण निर्माण केला आहे. त्यामुळे आता चांगले दिवस येतील असे वाटू लागल्याचे अण्णांनी म्हटले आहे. आमची एक समिती या सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवणार असून सहा महिन्यांनंतर मोदींचे सरकार जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यास अपयशी ठरल्यास देशभरात आंदोलन करु असा इशाराही अण्णांनी दिला आहे. काळ्या पैशांसंदर्भात विशेष तपास पथकाची नेमणूक करुन नरेंद्र मोदींनी चांगली सुरुवात केली असून यूपीए सरकार तपास पथक नेमण्यात अपयशी ठरले होते. त्या सरकारमधील मंत्रीच घोटाळ्यांमध्ये असल्याने सरकार तपास पथक नेमण्यास दिरंगाई करत असेल असे टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे. मंत्र्यांनी नातवाईकांना खासगी सचिव म्हणून नेमू नये या मोदींच्या आदेशाचेही त्यांनी स्वागत केले.
मोदींवर टीका करतानाच भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील अण्णांचे साथीदार व आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर अण्णांनी जोरदार टीका केली आहे. 'वाराणसीत केजरीवाल मोदींसमोर तग धरु शकणार नाही याचा अंदाज होता. दिल्लीच्या मतदारांनी मुख्यमंत्री बनवल्याने आता मतदार आपल्याला पंतप्रधानही बनवतील असे केजरीवालांना वाटू लागले आहे. केजरीवाल त्यांच्या मार्गावरुन भरकटले आहेत अशी टीका त्यांनी केली आहे.