ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - मोदी सरकारला सत्तेत येऊन वर्षभरापेक्षा जास्त कालावधी लोटला असून सत्तेवर आल्यापासून या सरकारने फक्त शोबाजीच केली अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान व नागरिकांचा मृत्यू होत असून पाकसाठी मोदींचे धोरण काय आहे असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पाटण्यात महाआघाडीची सभा पार पडली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, जदयूचे नेते नितीशकुमार, राजदचे लालूप्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे नेते आदी मान्यवर या सभेत उपस्थित होते. काही जणांना बिहारला कमी लेखण्यात आनंद मिळतो, पण काँग्रेसने नेहमीच बिहारला पाठिंबा दिला आहे असे सांगत सोनिया गांधींनी मोदींना टोला लगावला. केंद्रातील सरकार शेतकरीविरोधी आहे, व्यापम घोटाळ्याने मध्यप्रदेशमधील तरुणांचे भविष्य उध्वस्त केले असे आरोपही त्यांनी भाजपावर आहे. शेतक-यांसाठी आम्ही संसदेत लढलो व त्यामुळेच आता मोदी सरकारला भूसंपादन विधेयकावर झुकावे लागले असे सोनिया गांधींनी म्हटले आहे.
बिहारचे मुख्यमंत्री व जदयू नेते नितीशकुमार यांनीदेखील मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. आमचा डीएनए काम करण्याचा असून फक्त बोलणे आमच्या डीएनएत नाही असा चिमटा त्यांनी मोदींना काढला. काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले, पण अजून लोकांच्या बँक खात्यांमध्ये एक रुपयाही जमा झालेला नाही. जनधन योजनेंतर्गत १७ कोटी बँक खाती उघडण्यात आली, मात्र त्यापैकी निम्मी खाती निष्क्रीय आहेत असा आरोप नितीशकुमार यांनी केला.