संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला दोन्ही सभागृहांचं कामकाज चालवणं कठीण झाल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील खासदार कल्याण बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रातील मोदी सरकार सध्या व्हेंटिलेटरवर आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
मोदी सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत कल्याण बॅनर्जी म्हणाले की, मोदी सरकार जवळपास व्हेंटीलेटरवर आहे. हे सर्वांनाच दिसत आहे. त्यामुळेच या सरकारला काही काम करता येत नाही आहे. हे सरकार तरुणांना रोजगार देऊ शकत नाही आहे. भाजपाचे खासदारही स्वत: नोकरी मिळवू शकतील एवढे शिकलेले नाहीत. त्यामुळे ते इतरांना रोजगार देऊ शकत नाही आहेत, असा टोला कल्याण बॅनर्जी यांनी लगावला आहे.
दरम्यान, संसदेच्या वारंवार विस्कळीत होत असलेल्या कामकाजाबाबत भाजपा नेते आणि आज कामकाज पाहत असलेले तालिका अध्यक्ष जगदंबिका पाल म्हणाले की, जेव्हापासून अधिवेशन सुरू झाले आहे, तेव्हापासून एकही विधेयक पारित होऊ शकलेलं नाही. तुम्ही सर्वजण संसदेत असेल आलेले नाही आहात. तुम्हाला जनतेने निवडून पाठवले आहे. देशातील जनता विरोधी पक्षांच्या खासदारांना पाहत आहे. सभागृह अशा प्रकारे चालू शकत नाही. दरम्यान, विरोधकांकडून वारंवार येत असलेल्या अडथळ्यांवर टीका करत जगदंबिका पाल यांनी लोकसभेचं कामकाज ५ ऑगस्टपर्यंत स्थगित केलं आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन दोन आठवडे लोटले तरी संसदेत सरकारला एकही महत्त्वाचं विधेयक पारित करता आलेलं नाही. सोमवारीसुद्धा लोकसभेमध्ये कुठलंही विधेयक पारित झालं नाही. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत केवळ दोन दिवस कामकाज झालं आहे. त्यातील एक दिवस पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरच चर्चा झाली.