ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ४ - ऑनलाइन खरेदी करताना मोबाईलच्या जागी व्हिम बार मिळालेल्या स्नॅपडीलच्या नाराज ग्राहकाला हिंदुस्थान युनीलीव्हरने खरा मोबाईल फोन फुकट देऊन आश्चर्याचा धक्का दिला आहे. तसेच हिंदुस्थान युनीलीव्हरसारखी बडी कंपनी त्यांची काहीही चूक नसताना असा माणुसकीचा व्यवहार करू शकते हेदखील बघायला मिळाले आहे. घडलं असं की, लक्ष्मीनारायण कृष्णमूर्ती या ग्राहकाने स्नॅपडीलवर मोबाईल फोनची ऑर्डर नोंदवली होती. परंतु त्यांना चुकीने व्हीम बार या साबणाची डिलीव्हरी करण्यात आली. चिडलेल्या कृष्णमूर्तींनी स्नॅपडीलकडे तक्रारी केल्या तसेच सोशल मीडियावरही याची वाच्यता केली. आता, स्नॅपडीलकडून माफीची व योग्य डिलीव्हरीची प्रतीक्षा ते करत असतानाच त्यांना चक्क व्हिम बार बनवणा-या हिंदुस्थान युनीलिव्हरकडून हवा असलेला फोन पाठवण्यात आला. त्यासोबत आलेल्या पत्रात लिहिलेले होते की व्हिम हा आमचा अत्यंत लोकप्रिय ब्रँड आहे, आणि एकंदर प्रकरणात तुम्हाला जो मन:स्ताप झाला त्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं आणि म्हणून तुम्हाला हा फोन आम्ही भेट देत आहोत.
वस्तुत: यात एचयुएलची काहीही चूक नव्हती परंतु, आपल्या ब्रँडचा उल्लेख नकारात्मक कारणासाठी होऊ नये याबाबत दक्ष असलेल्या एचयुएलने स्नॅपडीलच्या ग्राहकाला खूश करत आश्चर्याचा धक्का दिला आहे आणि सध्याच्या स्पर्धात्मक युगात ब्रँडची ओळख जपणं किती महत्त्वाचं आहे याचा वस्तुपाठही दिला आहे.