वाहनधारकांकडून मोबाईल बंदीचे उल्लंघन
By admin | Updated: May 6, 2014 16:26 IST
मूर्तिजापूर : अपघातांना आळा बसावा यासाठी चालू वाहनावर मोबाईल वापरण्यावर बंदी असली तरी या नियमाचे पालन होत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मूर्तिजापूर शहर व ग्रामीण भागात हेच चित्र आहे. मोबाईलमुळे अनेकांनी आपला प्राण गमावला आहे. चौकाचौकात दुचाकीस्वार सर्रास मोबाईलचा वापर करताना दिसत आहे. मोबाईलचा वापर करताना कायद्याची पायमल्ली होत असली तरी कोणीही त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाही.
वाहनधारकांकडून मोबाईल बंदीचे उल्लंघन
मूर्तिजापूर : अपघातांना आळा बसावा यासाठी चालू वाहनावर मोबाईल वापरण्यावर बंदी असली तरी या नियमाचे पालन होत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मूर्तिजापूर शहर व ग्रामीण भागात हेच चित्र आहे. मोबाईलमुळे अनेकांनी आपला प्राण गमावला आहे. चौकाचौकात दुचाकीस्वार सर्रास मोबाईलचा वापर करताना दिसत आहे. मोबाईलचा वापर करताना कायद्याची पायमल्ली होत असली तरी कोणीही त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाही. प्रत्येक जण मोबाईल बाळगतो. वाहन चालवितानाही मोबाईलचा वापर केला जातो. एका हातात स्टेअरिंग आणि दुसर्या हातात मोबाईल, असा प्रकार सुरू असतो. अवैध प्रवासी वाहतूक करणारे तर हमखास मोबाईल कानाला लावून वाहन चालविताना दिसून येतात. आधीच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनात बसविले जातात. त्यामुळे चालकाला धड वाहनही चालविता येत नाही. त्यातच मोबाईलची रिंग वाजली, की चालक एका हाताने खिशातून मोबाईल काढून त्यावर बोलतो. कुणी हटकण्याचा प्रयत्न केला तर प्रवाशांवरच आरडाओरडा केली जातो. अनेक चालक तर वाहन चालविताना कानात इअरफोन लावून गाणे ऐकत असतात. एसटी बसेसमध्ये चालकांना मोबाईल वापरण्यावर बंदी आहे; परंतु या नियमाचे चालक अजिबात पालन करीत नाहीत. मागाहून येणार्या वाहनाने कितीही हॉर्न वाजविला तरी ऐकू येत नाही. मोबाईलचा होणारा असा वापर प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, असे पोलिस विभागाच्या वतीने सांगितले जाते. कायद्यातही तशी तरतूद करण्यात आली आहे; मात्र कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. (प्रतिनिधी)