नवी दिल्ली - मल्लिकार्जुन खरगे यांनी आज काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. २४ वर्षांनंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे. एकापाठोपाठ एक निवडणुकीतील पराभव आणि सातत्याने कमी होत जाणारा जनाधार अशा स्थितीत अध्यक्ष बनलेल्या खरगे यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. आता खरगे अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसला कितपत फायदा होणार हे पाहावे लागेल.
काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच खरगे यांनी आपल्या रणनीतीवर काम सुरू केले आहे. यात खरगे यांना यश आल्यास काँग्रेसला नवसंजीवनी मिळू शकते, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. जाणून घेऊया खरगे यांची रणनीती आणि ते त्यावर कसे काम करत आहेत? या विषयावर काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यानी म्हटलं की, आम्ही आमच्या चुकांमधून शिकलो आहोत आणि आता पुढे जात आहोत, आमचे नेते राहुल गांधी यांच्यासोबतच पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही काँग्रेसला नवे रूप देणार आहेत. 'राहुल गांधींची भारत जोडो यात्रा खूप यशस्वी आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसला ज्या प्रकारे लोकांचे प्रेम मिळत आहे, त्यावरून आगामी काळात काँग्रेसची कामगिरी चांगलीच नाही, तर यशही मिळेल, हे स्पष्ट होते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस नेते म्हणतात, 'मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधींपेक्षा वेगळ्या मिशनकडे वाटचाल करत आहेत. दक्षिण भारतातील दलित कुटुंबातील असलेले खरगे देशभरातील दलित, मागासवर्गीय, गरीब, शेतकरी, अल्पसंख्याकांची लढाई लढणार आहेत. खरगे या काळात दोन्ही समाजाला विशेषतः पक्षाशी जोडण्याचे काम करतील.
दलित - खरगे हे स्वतःही दलित आहेत. अशा स्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने ते देशातील दलित, आदिवासी, बौद्ध या घटकांना काँग्रेसशी जोडण्याचे काम करतील. देशातील २५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या एससी-एसटी वर्गात मोडते. ते काँग्रेससोबत गेल्यास २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फायदा होऊ शकतो.
अल्पसंख्यांक - दलित मतदारांसोबतच अल्पसंख्याक वर्गाला पक्षाशी जोडण्याचे काम खरगे करणार आहेत. यामध्ये मुस्लिम आणि शीख धर्मीयांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावर दलित-मुस्लिम युती झाली तर काँग्रेसला फायदा होईल. देशात भाजपचा मुकाबला केवळ काँग्रेसच करू शकते, हे मुस्लिम मतदारांना पटवून देण्याचा खरगे प्रयत्न करतील अशा परिस्थितीत दलित आणि मुस्लिम मिळून भाजपचा विजय रथ रोखू शकतात असं काँग्रेस नेत्यांना वाटतं.
दोन वर्षांत १९ राज्यांच्या निवडणुका, लोकसभेसाठीही मतदान होणार येत्या दोन वर्षात मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर १९ राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठे आव्हान असणार आहे. त्यात राजस्थानचाही समावेश आहे, जिथे सध्या काँग्रेसचे सरकार आहे. हे सरकार वाचवण्याचे आव्हानही खरगे यांच्या खांद्यावर असणार आहे. यासोबतच खरगे यांचे गृहराज्य कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांसाठी ही निवडणूक लिटमस टेस्टपेक्षा कमी नसेल. या निवडणुकांमधून खरगे यांच्या कामगिरीचे मूल्यमापन होणार आहे. यातून त्यांची पक्षात आणि पक्षाबाहेरील क्षमता तपासली जाईल.