विस्तारवादी मानसिकता म्हणजे मानसिक आजार; पंतप्रधान मोदींचा चीनवर निशाणा

By कुणाल गवाणकर | Published: November 14, 2020 12:26 PM2020-11-14T12:26:03+5:302020-11-14T12:31:20+5:30

दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान मोदी राजस्थानच्या जसलमेरमध्ये

mentality of expansion is a mental illness PM modi indirectly slams china | विस्तारवादी मानसिकता म्हणजे मानसिक आजार; पंतप्रधान मोदींचा चीनवर निशाणा

विस्तारवादी मानसिकता म्हणजे मानसिक आजार; पंतप्रधान मोदींचा चीनवर निशाणा

Next

जसलमेर: जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जसलमेरला पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे चीनवर निशाणा साधला आहे. भारताला आव्हान दिलं गेलं, तर जोरदार प्रत्युत्तर मिळेल. काही जण अजूनही विस्तारवादी मानसिकतेत अडकले आहेत. १८ व्या शतकातील ही मानसिकता म्हणजे एक मानसिक आजार असल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी दरवर्षीप्रमाणे यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. जसलमेरमधल्या लोंगेवाला पोस्टवर पोहोचलेल्या मोदींनी जवानांशी संवाद साधला.




भारतीय जवानांच्या वाटेला जाल, तर चोख प्रत्युत्तर मिळेल. दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारण्याची हिंमत भारतीय जवानांमध्ये आहे. बर्फाच्छादित डोंगर असो वा वाळवंट भारतीय जवान प्रत्येक परिस्थितीचा सामना यशस्वीपणे करतात. दरवर्षी मी तुम्हाला भेटायला येतो. तुम्हाला भेटल्याशिवाय माझी दिवाळी पूर्ण होत नाही. आज तुमच्यासाठी संपूर्ण देशाच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद घेऊन आलो आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.




'आज संपूर्ण जग विस्तारवादी शक्तींचा सामना करतंय. विस्तारवाद ही एक प्रकारची मानसिक विकृती आहे. ही विकृती अठराव्या शतकातील मानसिकता दाखवते. याविरोधात भारत आज प्रखरपणे आवाज उठवत आहे', अशा शब्दांत मोदींनी चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या कुरघोड्यांवर भाष्य केलं. 'भारत आपल्या सुरक्षेशी जराही तडजोड करणार नाही, हे आज संपूर्ण जगाला माहीत आहे. भारताची ही नवी ओळख देशाच्या जवानांमुळे आहे. तुमच्यामुळेच देश सुरक्षित आहे. तुमच्यामुळेच देश आज जागतिक व्यासपीठांवर आपली भूमिका अतिशय ठोसपणे मांडतोय,' अशा शब्दांत मोदींनी जवानांचं कौतुक केलं आहे.




यावेळी पंतप्रधानांनी लोंगेवाला पोस्टवर भारतीय जवानांनी १९७१ मध्ये दाखवलेल्या अतुनलीय शौर्याच्या आठवणींना उजाळा दिला. 'त्यावेळी पश्चिम पाकिस्तान (आताचा पाकिस्तान) पूर्व पाकिस्तानवर (आताच बांगलादेश) अत्याचार करत होता. आपली कृष्णकृत्यं लपवण्यासाठी, जगाचं लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्ताननं भारताच्या सीमेवर आक्रमण केलं. पण त्यांना ते महागात पडलं. लोंगेवालावर भारतीय जवानांनी पराक्रम गाजवला. तो इतिहास, तो पराक्रम, ते शौर्य आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात ताजा आहे,' अशा शब्दांत मोदींनी जवानांच्या साहसाच्या आठवणी जागवल्या.

Web Title: mentality of expansion is a mental illness PM modi indirectly slams china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.