आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी सरकारमध्ये बैठकांचे सत्र सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 02:29 AM2020-12-14T02:29:12+5:302020-12-14T06:57:28+5:30

शेतकरी ठाम; आज दिवसभर उपवास; विरोधक आक्रमक

Meetings begin in the government to break the deadlock of farmer protest | आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी सरकारमध्ये बैठकांचे सत्र सुरू

आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी सरकारमध्ये बैठकांचे सत्र सुरू

Next

नवी दिल्ली : नव्या केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र झाले आहे. सोमवारी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर सरकारविरोधात एका दिवसाचा उपवास करणार आहेत. आंदोलनाची धग वाढत असल्याने रविवारी दुपारी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे धाव घेतली. बैठकीत दीर्घ चर्चा झाली. कायदा रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असल्याने सरकारची कोंडी झाली आहे.

गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत राज्यमंत्री सोम प्रकाशदेखील उपस्थित होते. सत्ताधाऱ्यांची राजकीय कोंडी शेतकरी आंदोलनामुळे झाली आहे. कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी सरकारची बाजू मांडताना शेतकऱ्यांनी चर्चेची तयारी दाखवायला हवी, असे म्हटले आहे. गेल्या साठ वर्षांत विरोधकांनी केवळ राजकारण केले. आताही शेतकऱ्यांच्या वापर करून राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकरी चर्चेसाठी दोन पावले पुढे सरकले तर सरकारदेखील पुढे येईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

विरोधकांनी सरकारविरोधात सूर तीव्र केला आहे. आम आदमी पक्षानेदेखील शेतकऱ्यांच्या एकदिवसीय उपवासात सहभागी होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. आम आदमी पक्षाचे सर्व नेते, आमदार, कार्यकर्ते कृषी कायद्यांविरोधात उपवास करून शेतकऱ्यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा कामगारमंत्री गोपाल राय यांनी केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदेखील उपवास करणार आहेत. पंजाबमधून या कायद्यास सर्वाधिक विरोध होत आहे. पंजाबच्या तुरुंगमहासंचालकांनी देखील निवृत्तीची घोषणा केली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीदेखील जंतर-मंतरवर शेतकरी आंदोलनात हजेरी लावली.

आयआरसीटीसीची सोशल मीडियावर चर्चा
आयआरसीटीसीच्या एका पुस्तिकेवरूनही सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. ४७ पानांच्या या पुस्तिकेत सरकार व शीख समुदायाच्या सकारात्मक संबंधांवर माहिती आहे. सिंह अडनाव असलेले व पंजांबी नागरिकांनाच ही पुस्तिका पाठवली जात आहे. त्यावर सरकारने स्पष्टीकरण देताना, ही पुस्तिका आधीच प्रसिद्ध झाल्याचे सांगितले.

आंदोलनात काही राष्ट्रविरोधी व्यक्ती असल्याचा आरोप भाजपच्या काही नेत्यांनी व सोशल मीडियावरून करण्यात येत आहे. त्यावर संतप्त प्रतिक्रिया देताना भारतीय किसान संघटनेचे नेते राकेश टिकैत म्हणाले, तसे असेल तर सरकारने त्यांना शोधावे. सरकारने गुप्तहेर यंत्रणेचा वापर करावा. आम्हाला मात्र असे राष्ट्रविरोधी कुणी आढळले नाही.

सिंघू सीमेवर दर मिनिटाला येतात शेतकरी
सिंघू सीमेवर दर मिनिटाला नव-नवे ट्रक आणि ट्रॉली येत आहेत. पंजाबमधील अनेक जिल्ह्यांतून वेगवेगळ्या मार्गांनी शेकडो वाहने दिल्लीत येत असून त्यांना सीमेवर कोणीही अडवत नाही. पहाटे सहा वाजता २० शेतकऱ्यांना ताजपूर येथून घेऊन ट्रॉली आली. ट्रॉली साडेनऊ वाजता लुधियानाला परत गेली. रात्रभर ते पावसात प्रवास करत होते.

शेतकऱ्यांपैकी अमनदीप सिंग (वय २५) म्हणाला की, काही शेतकरी शेतात काम करण्यासाठी त्यांच्या गावात गेले. मग आम्ही आमच्या गावचे प्रतिनिधित्व सामूहिकरित्या करण्याचे ठरविले. आम्ही जर परत गेलो तर आमची जागा इतर ट्रक्समधून आलेले लोक घेतील. ज्यांना या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे असे अनेक लोक आहेत. 

Web Title: Meetings begin in the government to break the deadlock of farmer protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.