उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला तिच्या नवऱ्याची दाढी अजिबात आवडत नव्हती. त्यामुळे ती सतत नवऱ्याला कापून टाक असं सांगत होती. पण जेव्हा तिच्या नवऱ्याने नकार दिला तेव्हा ती इतकी नाराज झाली की क्लीन शेव केलेल्या दिरासोबत पळून गेली. आता नवऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली आहे की त्याची बायको त्याच्याकडे ५ लाखांची मागणी करत आहे.
मेरठमधील लिसाडी गेट पोलीस स्टेशन परिसरातील उज्ज्वल गार्डन कॉलनीत ही घटना घडली. मौलाना शाकीर याचा निकाह ७ महिन्यांपूर्वी इंचौली येथील रहिवासी असलेल्या अर्शीशी झाला होता. अर्शीला शाकीरची दाढी अजिबात आवडत नव्हती. तिने शाकीरला अनेकदा सांगितलं की, जर त्यांना एकत्र राहायचं असेल तर त्याला दाढी काढावी लागेल. पण शाकीरने स्पष्टपणे नकार दिला. या प्रकरणावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला.
शाकीरने हे बायकोच्या कुटुंबीयांनाही सांगितलं, पण त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. याच दरम्यान शाकीरला समजलं की, त्याच्या बायकोची दिरासोबतची जवळीक वाढली आहे. ३ महिन्यांपूर्वी ३ फेब्रुवारी रोजी अर्शी तिचं सर्व सामान घेऊन तिच्या दिरासोबत पळून गेली. शकीरने पोलीस ठाण्यात बायको आणि भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
शाकीर म्हणतो की, आता अर्शी ५ लाख रुपये देण्यासाठी त्याच्याकडे दबाव आणत आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे आणि न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. मेरठचे एसपी सिटी आयुष विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. लवकरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.