MEA on Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादल्यानंतर, भारत आणि रशियाच्या संबंधांवर भाष्य केले होते. दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मृत असल्याची टीका ट्रम्प यांनी केली होती. आता या टीकेला आज (१ ऑगस्ट २०२५) भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रत्युत्तर दिले आहे. रणधीर जयस्वाल म्हणाले की, विविध देशांसोबतचे आमचे द्विपक्षीय संबंध स्वतःच्या अटींवर आधारित आहेत. यात कोणत्याही तिसऱ्या देशाच्या नजरेतून पाहू नयेत.
भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभेपरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल पुढे म्हणाले, भारत आणि रशिया हे स्थिर भागीदार असून, वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे आहेत. आमच्या संरक्षण गरजांची पूर्तता पूर्णपणे आमच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक मूल्यांकनाद्वारे निश्चित केली जाते. भारत-अमेरिका भागीदारीत अनेक बदल आणि आव्हाने आली आहेत. आम्ही अमेरिकेसोबत ज्या ठोस अजेंड्यावर वचनबद्ध आहोत, त्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की, अमेरिकेसोबतचे आमचे संबंध पुढे जात राहतील.
इराणसोबत व्यवसाय करणाऱ्या भारतीय कंपन्यांवर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांशी संबंधित प्रश्नांवर रणधीर जयस्वाल म्हणाले,"आम्ही निर्बंधांची दखल घेतली आहे, त्यावर विचार करत आहोत. भारतीय तेल कंपन्यांनी रशियन तेलाचा पुरवठा थांबवल्याच्या वृत्तांनाही त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ऊर्जा पुरवठ्याच्या गरजांबद्दल आमचा दृष्टिकोन सर्वांना माहिती आहे. आम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या संसाधनांवर आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीवर लक्ष ठेवतो.
अलिकडच्या काही महिन्यांत रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार राहिला आहे. भारताच्या आयातीमध्ये त्याचा वाटा सुमारे ३५-४० टक्के आहे, जो युक्रेन युद्धापूर्वी फक्त ०.२ टक्के होता. यावर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले होते की, भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवावे, कारण यामुळे रशियाला युक्रेन युद्धात फायदा होत आहे. यावरच बोलताना त्यांनी दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मृत असल्याची टीका केली होती. मात्र, आता भारताने अमेरिकेच्या टीकेला थेट प्रत्युत्तर दिले आहे.