तामिळनाडूतील तिरुवल्लूर रेल्वे स्थानकावर एक भयानक अपघात घडला. डिझेलने भरलेल्या मालगाडीला अचानक आग लागली. काही वेळातच आग अनेक डब्यांमध्ये पसरली, यातून मोठ्या ज्वाळा उठू लागल्या. या घटनेमुळे संपूर्ण स्थानकात घबराट निर्माण झाली.
मालगाडीतील आगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. आग इतकी भीषण होती की, जोरदार ज्वाळ्यांसह संपूर्ण आकाशात धुराचे काळे ढग दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच कर्मचारी त्वरित कामाला लागले. अग्निशमन विभाग आणि बचाव पथकाला याची माहिती देण्यात आली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतरही अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणता आली नाही.
आगीचा व्हिडिओ व्हायरल
रेल्वेच्या बोग्यांमध्ये डिझेल भरले होते. डिझेलमुळे आग वाढत गेली. यामुळे आग आटोक्यात आणणे कठीण झाले. ही आग एकामागून एक ४ बोग्यांमध्ये पसरली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही ट्रेन मनालीहून तिरुपतीला जात होती. वाटेत तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनला आग लागली. प्रशासनाने जवळील लोकांना स्टेशन रिकामे करण्याचे निर्देश दिले.
या घटनेमुळे चेन्नईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्याही थांबवण्यात आल्या आहेत. दक्षिण रेल्वेने ८ गाड्या रद्द केल्या आहेत आणि ५ गाड्या वळवण्यात आल्या आहेत.