Faridabad Fire: हरियाणातील फरीदाबादमध्ये सोमवारी संध्याकाळी एका औद्योगिक युनिटला लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण परिसर हादरवून सोडला आहे. सेक्टर-२४ मधील मुजेशर भागातील एमजीए इंडस्ट्रीज या फॅक्टरीत ही आग लागली. एका लहानशा ठिणगीमुळे झालेल्या या दुर्घटनेत ४० हून अधिक लोक गंभीररित्या भाजले असून दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही जखमींमध्ये समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या फॅक्टरीत सीएनसी मशीनने स्टील प्लेट्स कापण्याचे काम सुरू होते. सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास प्लेट कापताना निघालेली एक ठिणगी जवळच असलेल्या केमिकलच्या ड्रममध्ये पडली. कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण काही क्षणातच केमिकल ड्रमचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण फॅक्टरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
जखमींचा आकडा ४० च्या पार
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या आगीत ४० हून अधिक लोक होरपळले आहेत. यापैकी १२ जणांना बादशाह खान सरकारी रुग्णालयात, तर इतरांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये मनोज, लुकमान, अनीश, राकेश, विपिन आणि रविंदर या कामगारांसह बचाव कार्यात मदत करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
स्फोटाचा थरार आणि वाहनांचे नुकसान
आग लागली तेव्हा फॅक्टरी परिसरात १० हून अधिक गाड्या उभ्या होत्या, ज्या पूर्णपणे जळून कोळसा झाल्या आहेत. स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत, मात्र फॅक्टरीत तेलाचे ड्रम असल्याने आग विझवताना मोठा अडथळा येत होता.
तपास सुरू, मालकाची चौकशी
सुरुवातीला हा अपघात शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा संशय होता, मात्र प्राथमिक तपासणीत सीएनसी मशीनची ठिणगी आणि केमिकलचा स्फोट हेच मुख्य कारण समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून मालकाची चौकशी केली जात आहे. फॅक्टरीत सुरक्षा नियमांचे पालन झाले होते की नाही, याचाही शोध घेतला जात आहे.
Web Summary : A major fire erupted at a Faridabad factory after a chemical explosion, injuring over 40 people, including police. Sparks ignited chemicals during steel cutting, causing the blast. Ten vehicles were destroyed. An investigation is underway to determine if safety protocols were followed.
Web Summary : फरीदाबाद की एक फैक्ट्री में रासायनिक विस्फोट से भीषण आग लग गई, जिसमें पुलिस सहित 40 से अधिक लोग घायल हो गए। स्टील कटिंग के दौरान चिंगारी से रसायन में आग लग गई, जिससे विस्फोट हुआ। दस वाहन नष्ट हो गए। सुरक्षा प्रोटोकॉल का पालन किया गया था या नहीं, इसकी जांच चल रही है।