Punjab Crime:पंजाबमध्ये दिवसाढवळ्या एका मॅनेजरला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबमधील मोगामध्ये मास्क घातलेल्या हल्लेखोरांनी हा सगळा प्रकार घडवून आणला. मोगा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बधनी कलान येथील दोधार गावात पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकाच्या घरावर कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी हल्ला केला. या घटनेचे सीसीटीव्ही समोर आलं आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बँकेच्या मॅनेजरने पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. मात्र हे प्रकरण गांभीर्याने घेत, बधनी कलान पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बँकेच्या मॅनेजरवर मास्क घातलेल्या तीन व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यातून तो थोडक्यात बचावला. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत आत जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याने वेळेत दरवाजा बंद केल्याने तो वाचला.
व्हिडीओमध्ये तीन मास्क घातलेले हल्लेखोर एका पांढऱ्या कारमधून उतरताना दिसत आहेत. त्यापैकी एक मॅनेजरचा दरवाजा ठोठावतो. मॅनेजर दार उघडणार असल्याचे पाहताच तो लगेच इतरांना तयार राहण्याचा इशारा करतो. इशारा मिळताच इतर दोघांनी गाडीच्या मागच्या सीटवरून काठ्या काढल्या. घराचा दरवाजा उघडताच मास्क घातलेल्यांपैकी एकाने बनियान आणि चड्डीवर मॅनेजरला बाहेर ओढले. तर बाकीच्यांनी त्याच्यावर काठ्यांनी हल्ला केला.
मॅनेजर दार बंद करण्याचा प्रयत्न करत असताना, ते लोक त्याला मारहाण करतच होते. शेवटी तो दरवाजा बंद करण्यात यशस्वी झाला आणि त्याचा जीव वाचला. त्यानंतर हल्लेखोरांनी दार उघडण्याचे प्रयत्न केले आणि नंतर गाडीकडे परत धावत निघून गेले. माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून या प्रकरणी गुन्हा दाखल केला. फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. हल्लेखोरांची ओळख पटवून लवकरच त्यांना अटक केली जाईल असे स्थानिक पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.