अनेकजण देवदर्शनासाठी मंदिरात जातात. यावेळी काही भक्त मंदिरातील दानपेटीत अनेक प्रकारचे दान करतात. परंतु दानपेटीत कधी चुकून फोन पडला आणि तो फोन आयफोन असला तर मग? अशीच एक विचित्र घटना तामिळनाडूतील चेन्नईजवळील तिरुपुरूर कंदासमी मंदिरात घडली आहे. या मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या एका भक्ताचा आयफोन चुकून दानपेटीत पडला. त्यानंतर या भक्ताने मंदिर प्रशासनाकडे दानपेटीत पडलेला आयफोन परत मागितला. परंतु, मंदिर प्रशासनाने नकार दिला. हा आयफोन देवाला दान झाल्याचे मंदिर प्रशासनाने म्हटले.
मिळालेल्या माहितीनुसार, विनयगापुरम येथे राहणारा दिनेश नोव्हेंबरमध्ये कुटुंब सह मंदिरात दर्शनासाठी आला होता. खिशातून दक्षिणा देत असताना अनावधानाने आयफोन दानपेटीत पडला. यानंतर त्यांनी मंदिर प्रशासनाशी संपर्क साधून मोबाईल परत करण्यास सांगितले. मंदिर प्रशासनाने सांगितले की, दानपेटी दोन महिन्यातून एकदा उघडली जाते. यानंतर दिनेश मंदिरातून रिकाम्या हाताने परतला. २० डिसेंबर रोजी मंदिराची दानपेटी उघडण्यात आली. त्यात एक मोबाईल सापडला. मंदिर प्रशासनाने दिनेशला याबाबत माहिती दिली.
प्रशासनाने त्याला सांगितले की, मोबाईल परत केला जाणार नाही, कारण परंपरेनुसार दानपेटीत आलेली प्रत्येक गोष्ट मंदिराच्या देवतेच्या खात्यात जाते. तुम्ही तुमचे सिम कार्ड आणि फोन डेटा घेऊ शकता. मात्र, मोबाईल परत करण्याची दिनेशची मागणी आहे. तामिळनाडूचे मंत्री पीके शेखर बाबू म्हणाले की, नियमांनुसार दानपेटीतील अर्पण मंदिर देवतेच्या खात्यात जाते. नियमानुसार, मंदिर प्रशासन भक्ताला त्यांचा नैवेद्य परत करू देत नाही.
याआधी एका महिलेची सोनसाखळी दानपेटीत पडली होतीमंदिर प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दानपेटीत मौल्यवान वस्तू पडण्याची ही पहिलीच घटना नाही. मे २०२३ मध्ये, केरळमधील अलाप्पुझा येथील रहिवासी एस. संगीता यांनी श्री धनादयुथापानी स्वामी मंदिराला भेट दिली. संगीता या गळ्यातील तुळशीची माळ काढत असताना तिची १४ ग्रॅम सोन्याची चेन दानपेटीत गेली. संगीता यांनी याची माहिती मंदिर प्रशासनाला दिली होती. संगीताची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मंदिरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. यानंतर मंदिर प्रशासनाने त्यांना त्याच वजनाची नवीन साखळी खरेदी करून दिली, पण जुनी परत केली नाही.