Manipur Violence ( Marathi News ) : इंफाळ : मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. चुराचांदपूर जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा दोन विद्यार्थी गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली. यानंतर मणिपूर सरकारने जिल्ह्यात पाच दिवस मोबाइल इंटरनेट बंद केले आहे. याशिवाय, दोन महिन्यांसाठी जिल्ह्यात सभांना बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे, हिंसक चकमकीत अनेक नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, सीआरपीसीच्या च्या कलम १४४ अंतर्गत निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत.
मणिपूरमध्ये सोमवारी झालेल्या तुरळक हिंसाचारानंतर चुराचांदपुर जिल्ह्यात दोन महिन्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, लोकांच्या दोन गटांमधील संघर्षामुळे अजूनही शांतता भंग होण्याची शक्यता आहे. सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहे. हा प्रतिबंधात्मक आदेश सोमवारी लागू करण्यात आला असून तो १८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत लागू राहील. या अंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास आणि शस्त्र बाळगण्यास मनाई आहे.
सीबीआयचे संचालक प्रवीण सूद हे मणिपूरमधील जातीय हिंसाचाराच्या प्रकरणांच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी इंफाळला पोहोचले. सीबीआय हिंसाचाराच्या २७ प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान, मे महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत सीबीआयच्या जवळपास सर्व युनिट्सना भेट देणारे प्रवीण सूद हे पहिले सीबीआय प्रमुख आहेत. सोमवारी संध्याकाळी पाच वाजता ते गुवाहाटीहून इंफाळ विमानतळावर पोहोचले. राज्यातील सद्यस्थितीबाबत राज्याचे डीजीपी राजीव सिंह यांच्याशी चर्चा केली.