Manipur Violence : ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात 3 मे 2023 पासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जखमी झाले आहेत. याबाबत आता मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी या हिंसाचाराबद्दल राज्यातील जनतेची माफी मागितली आहे. ते म्हणाले की, 'हे संपूर्ण वर्ष खूप वाईट गेले. राज्यात जे काही घडले, त्याबद्दल मी मणिपूरच्या जनतेची माफी मागतो. अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले, अनेक लोक बेघर झाले, याबद्दल मी खूप दु:खी आहे.'
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, 'हे संपूर्ण वर्ष अत्यंत दुर्दैवी गेले. 3 मे 2023 पासून आजपर्यंत राज्यातील जे काही घडले, त्याबद्दल मला जनतेची माफी मागायची आहे. मला खरच माफ करा. गेल्या 3-4 महिन्यांपासून राज्यात शांतता आहे. मला आशा आहे की, नवीन वर्षामध्ये राज्यात सामान्य स्थिती आणि शांतता पूर्ववत होईल. मी राज्यातील सर्व समाजाला आवाहन करू इच्छितो की, आपल्याला भूतकाळातील चुका विसरून नव्या आयुष्याला सुरुवात करावी लागेल. शांततापूर्ण मणिपूर, समृद्ध मणिपूरसाठी आपण सर्वांनी एकत्र राहायला हवे.'
बिरेन सिंह पुढे म्हणतात, 'आतापर्यंत हिंसाचारात सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाला, तर 12 हजार 247 एफआयआर नोंदवण्यात आले. 625 आरोपींना अटकही झाली आहे. तर, सुमारे 5 हजार 600 शस्त्रे आणि स्फोटकांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. बेघर कुटुंबांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पुरेसे सुरक्षा कर्मचारी आणि पुरेसा पैसा उपलब्ध करून दिला आहे. विस्थापितांनाही नवीन घरे बांधून दिली जाणार आहेत. मणिपूरमध्ये हिंसाचाराचा झाल्यापासून संवेदनशील जिल्ह्यांच्या सीमेवर केंद्रीय सैन्याच्या तैनातीनंतर गोळीबाराच्या घटना कमी झाल्या आहेत,' अशी माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.