जवळपास दोन वर्षे सुरू असलेल्या संघर्षानंतर मणिपूरमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर राज्यात शांतता प्रस्तापित करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली जात आहे. दरम्यान, मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यातील तुइबोंग गावामध्ये आसाम रायफल्सच्या जवानांसमोर १६ हत्यारे आणि दारुगोळा जमा केला. राज्यपाल अजय कुमारभल्ला यांनी दिलेल्या सक्त इशाऱ्यानंतर ही शस्त्रास्त्रं सरकारजमा झाली आहेत. अजय भल्ला यांनी जमावाने पोलिसांकडून लुटण्यात आलेली शस्त्रास्त्रे आणि अवैध शस्त्रास्त्रे सात दिवसांच्या आत जमा करण्याचे आवाहन केले होते.
आसाम रायाफल्सने याबाबत दिलेल्या माहितीनुसार आसाम रायफल्सने पोलीस, सीआरपीए, राज्य गुप्तचर संस्था आणि राज्य प्रशासनासोबत मिळून जोमी आणि कूकी समुदायांच्या नेत्यांसोबत चर्चा केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या सुरक्षेविषयीच्या चिंता दूर करण्यात आल्या आहेत. त्यांना सुरक्षेचं आश्वासन देण्यात आलं आहे. तसेच या भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने सकारात्मक परिणामांवर भर देण्यात आला आहे.
संयुक्त सुरक्षा दलांनी आणि राज्य प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर, जोमी आणि कूकी समुदायाच्या नेत्यांनी स्थानिकांशी संपर्क साधला. तसेच २२ फेब्रुवारी रोजी चुराचांदपूर जिल्ह्यातील तुईबोंग गावामध्ये स्वेच्छेने पहिला टप्प्यातील हत्यारं जमा केली. सरकारजमा करण्यात आलेल्या हत्यारांमध्ये एक एम-१६ रायफल, एक ७.६२ मिलिमीचर एसएलआर, दोन एके रायफल्स, तीन इन्सास रायफल्स, दोन एम-७९ ग्रेनेड लॉन्चर आणि अन्य हत्यारांचा समावेश आहे.