लखनऊ: उत्तर प्रदेशच्या राजधानीत एक धक्कादायक प्रकार घडला. एका खासगी रुग्णालयानं तरुणाला मृत घोषित केलं. यानंतर त्याला घरी नेण्यात आलं. चार तासांनंतर त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. अंत्यसंस्कारावेळी शोकाकुल वातावरण असताना अचानक मृत तरुणानं डोळे उघडले आणि त्यानं इशाऱ्यानं पाणी मागितलं. यानंतर तो कपभर पाणी प्यायला. यानंतर सगळ्यांना एकच धक्का बसला. उपस्थित नातेवाईकांनी त्याला बलरामपूरमधील रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अमिनाबादचे रहिवासी असलेल्या गुरु प्रसाद यांचा मुलगा संजयची (वय २८ वर्षे) प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली. त्यामुळे त्याला दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला कावीळ झाल्याचं सांगितलं. चार-पाच दिवस त्याच्यावर उपचार झाले. पण काहीच उपयोग झाला नाही. शनिवारी त्याला नक्खासमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 'संजयला सकाळी सहाच्या सुमारास मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर आम्ही त्याचा मृतदेह घेऊन घरी आलो', असं त्याच्या मावशीच्या मुलीनं सांगितलं. सकाळी १० वाजता संजयच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. त्यावेळी त्याच्या शरीरानं हालचाल केली. त्यानं डोळे उघडले. पाण्यासाठी इशारा केला आणि एक कप पाणीदेखील प्यायला. यानंतर त्याच्या कुटुंबियांनी बलरामपूरमधील रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
...अन् अंत्यसंस्कारावेळी 'मृत' मुलगा उठला, पाणी मागू लागला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 16:37 IST