Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुमारे 10 तास चाललेल्या चकमकीत दहशतवादी बुरहान वानीचा शेवटचा जिवंत साथीदार फारुख नली आणि त्याचे चार साथीदार मारले गेले आहेत. फारुख नलीचा खात्मा हे सुरक्षा दलांसाठी मोठे यश आहे. काश्मीर खोऱ्यातील हिजबुल मुजाहिद्दीनचे नेतृत्व फारुख नली याच्याकडे होते.
फारुख नलीवर 10 लाखांचे बक्षीस फारुख नली हा A+ श्रेणीचा दहशतवादी होता आणि त्याच्यावर सरकारने 10 लाखांचे बक्षीस ठेवले होते. फारुख नली 2014-2015 मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाला होता. बुरहान वानीच्या गटातील 14 कमांडरमध्ये फारुख नली हा एकमेव कमांडर शिल्लक होता. गेल्या 9 वर्षांपासून तो हिजबुल मुजाहिद्दीनचे नेतृत्व करू लागला. त्याच्या नेतृत्वात दक्षिण काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी कारवाया झाल्या आहेत.
हिजबुल मुजाहिद्दीनला मोठा धक्का हिजबुलचा शेवटचा कमांडर फारुख नली याचा गेल्या अनेक वर्षांपासून सुरक्षा यंत्रणांकडून शोध सुरू होता. एका मोठ्या कारवाईत सुरक्षा दलांना चकमा देऊन फारुख पळून जाण्यातही यशस्वी झाला होता. फारुख नलीवर सुरक्षा दलांवरील हल्ले, टार्गेट किलिंग आणि नवीन तरुणांना हिजबुलमध्ये भरती केल्याचा आरोप होता. आता अखेर अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर फारुख नली ठार झाला आहे. यामुळे हिजबुल मुजाहिद्दीनला मोठा धक्का बसला आहे.
अमित शाहांची उच्चस्तरीय बैठक या चकमकीनंतर गृह मंत्रालय अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी विशेषत: जम्मू-काश्मीरशी संबंधित सुरक्षा मुद्द्यांवर उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेतली. या बैठकीत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा देखील सहभागी झाले. याशिवाय, जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव अटल दुल्लू आणि जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक नलिन प्रभात, गृहसचिव गोविंद मोहन, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक सदानंद दाते, बीएसएफ प्रमुख दलजीत सिंह चौधरी हेही बैठकीत उपस्थित होते.