पुरी (ओडिशा) : देशातील सर्वांत मोठा धार्मिक महोत्सव म्हणून ओळख असलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रेत शनिवारी अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी सहकुटुंब सहभागी झाले. या महोत्सवात अदानी फाउंडेशनने प्रसाद सेवा सुरू केली असून, २६ जून ते ८ जुलैदरम्यान या यात्रेत सर्व भाविक आणि कार्यकर्त्यांना प्रसादस्वरूपात भोजन वाटप केले जात आहे. दरम्यान, गौतम अदानी यांनी इस्कॉनच्या महाप्रसादालयाच्या स्वयंपाकघराला भेट देऊन तेथे सेवा दिली.
अदानी यांच्यासोबत पत्नी प्रीती अदानी व मुलगा करण अदानी होते. यावेळी अदानी यांनी इस्कॉनच्या प्रसादालयातील स्वयंपाकघरात मदत केली. पत्नीसोबत त्यांनी या व्यवस्थेची पाहणी केली.
अदानी फाउंडेशनच्या वतीने या रथयात्रेत ४० लाख भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. इस्कॉन, स्थानिक धार्मिक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने अदानी फाउंडेशनने या यात्रेत ही सेवा सुरू केली आहे.
९ दिवस दिली जाईल सेवा
ही केवळ एक यात्रा नाही, तर भक्ती, सेवा आणि समर्पणाचा एक उत्सव आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि ओडिशाच्या विकासासाठी आपण भगवान जगन्नाथच्या चरणी प्रार्थना केल्याचे अदानी म्हणाले.
देश असाच विकासाकडे वाटचाल करीत राहो आणि याचा लाभ सर्व जनतेला व्हावा, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
रेनकोट, कॅप, छत्र्यांचे केले वितरण
भाविकांना महाप्रसादासह अदानी फाउंडेशनने स्वच्छता कर्मचाऱ्यांना जॅकेट, स्वयंसेवकांना टी-शर्टस आणि सुरक्षा दलांचे जवान, तसेच भाविकांना रेनकोट, कॅप व छत्र्यांचे वाटप केले आहे.