प्रयागराज महाकुंभसाठी कोट्यवधी भाविक येत आहेत. त्यामुळे संगम आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे भाविकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे गर्दीमुळे स्थानिक लोकांनाही खूप त्रास सहन करावा लागत आहे. लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तूही मिळत नाहीत.
प्रयागराजमध्ये प्रचंड गर्दीमुळे स्थानिक लोकांना ये-जा करणं देखील अवघड झालं आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, बॅरिकेडिंग आणि रस्ते बंद असल्याने लोक वेळेवर त्यांच्या कार्यालयात पोहोचू शकत नाहीत. संपूर्ण शहराची व्यवस्था कोलमडताना दिसत आहे. कमी अंतर प्रवास करण्यासाठीही लोक दिवसभर वाहतूक कोंडीत अडकतात.
दैनंदिन वापराच्या वस्तूंचा तुटवडा
संगमला येणाऱ्या लोकांमुळे येथे अन्नधान्याची कमतरता आहे. एका स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार, गर्दीमुळे स्थानिक लोकांना ये-जा करण्यात खूप त्रास होत आहे. रेशन मिळत नाही, दूधही मिळत नाही. वाहतूक कोंडीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं कठीण झालं आहे. लोकांनी घराबाहेर पडणं त्यामुळे आता बंद केलं आहे. लोक खूप गरज असेल तरच बाहेर पडत आहेत.
भाविकांनी काही वेळा गैरसोय झाल्याचं मान्य केलं असलं तरी, त्यांनी योगी सरकारच्या कामाचं देखील कौतुक केलं आणि त्रिवेणी संगमावर गंगेत स्नान केल्याचं सांगितलं. आम्हाला खूप बरं वाटत आहे. सरकारने येथील व्यवस्था इतकी चांगली हाताळली आहे की इथे इतकी गर्दी असूनही आम्हाला जास्त अडचणी आल्या नाहीत. गंगेत स्नानही चांगलं झालं. येथील पोलीस प्रशासनाने खूप सहकार्य केलं आहे असं म्हटलं आहे.