लखनऊ : उत्तर प्रदेशमधून भाजपला उखडून फेकण्याच्या संकल्पातून स्थापन झालेल्या सपा-बसप-रालोद आघाडीला अपेक्षेपेक्षा कमीच यश मिळाले. प्रदेशातील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी कमीत कमी ६० जागा जिंकण्याची आशा आघाडीस होती. ती केवळ १५ जागा मिळाल्याने धुळीस मिळाली. राजकीय तज्ज्ञांच्या अंदाजे आघाडीला अतिआत्मविश्वास नडला. भाजपच्या भक्कम रणनीतीमुळे राजकीय खिचडी शिजू शकली नाही.
मतदानाच्या टक्केवारीचा हिशेब पाहता सपा-बसप-रालोद आघाडीचा प्रयोग अगदी अपयशी सिद्ध झाला. एकमेकांची मते मिळविण्याचा दावा करणाऱ्या सपा आणि बसपच्या मतांची टक्केवारी वाढण्याऐवजी घटली.निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सपाला २२.३५ टक्के मते मिळाली होती. तो आकडा घटून १७.९६ टक्क्यांवर आला. गेल्या वेळी बसपला १९.७७ टक्के मते मिळाली होती, ती यंदा १९.२६ टक्क्यांवर आली. रालोदची स्थिती ५ वर्षांपूर्वी जशी होती, तशीच आजही आहे. एकही जागा दोन्ही निवडणुकांमध्ये या पक्षाला मिळाली नाही. मात्र मतांची टक्केवारी ०.८६ वरून १.६७ टक्क्यापर्यंत वाढली.तसे पाहता आघाडी बसपसाठी लाभदायक ठरली. २०१४ मध्ये एकही जागा न मिळालेला हा पक्ष यंदा मात्र मतांची टक्केवारी घटूनही यशस्वी ठरला. यंदा बसपला १० जागांवर यश मिळाले. तर समाजवादी पक्षाला गेल्या वेळी असलेल्या ५ जागा राखत आनंद मानावा लागला. वरिष्ठ नेता शिवपाल सिंह यादव यांची नाराजी आणि स्वतंत्रपणे पक्ष स्थापन करून निवडणूक लढविण्यामुळे सपाचे नुकसान झाले.