ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. ५ - दोन पोलीस अधिका-यांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्याने दोघांचाही मृत्यू झाला आहे. यापैकी एका अधिका-याने पहिले दुस-या अधिका-यावर गोळी झाडली व नंतर स्वतःवर गोळी झाडल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेने मध्यप्रदेशातील पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली. टीकमगढ येथील पृथ्वीपूर पोलीस ठाण्यातील वरीष्ठ अधिकारी के.एस. मलीक यांनी आपले कनिष्ठ अधिकारी प्रमोद चतुर्वेदी यांना चर्चेकरता आपल्या केबीनमध्ये बोलवले होते.
प्रमोद चतुर्वेदी चर्चेकरता गेले असता या दोघांमधील चर्चेने वादाचे रुप धारण केले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये मोठमोठ्याने वाद होत होते. त्यानंतर आलेल्या गोळ्यांच्या आवाजाने पोलीस कर्मचा-यांनी मलीक यांच्या केबीनमध्ये डोकावून पाहिले असता दोघांचेही मृतदेह त्यांना रक्ताच्याथारोळ्यात पडलेले अढळले.
ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता घडली असल्याचे पोलीस कर्मचा-यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच टीकमढचे पोलीस अधिक्षक अनुराग शर्मा आणि पोलीस महानिरीक्षक पंकज श्रीवास्तव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मलीक यांची केबीन पुर्णतः सील केली आहे.