मध्य प्रदेशातील झाबुआ येथील मेघनगर भागात रात्री एक भीषण अपघात झाला, ज्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानहून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक मारुती इको व्हॅनवर उलटला. इकोमधील ११ पैकी ९ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात रात्री ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात सिमेंटने भरलेला ट्रेलर ट्रक एका व्हॅनवर उलटल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. लग्नावरून परतत असताना काळाने घाला घातला. एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
झाबुआचे पोलीस अधीक्षक पद्मविलोचन शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मेघनगर तहसील क्षेत्रातील संजेली रेल्वे क्रॉसिंगजवळील रस्त्यावरून ट्रक बांधकामाधीन रेल्वे ओव्हर-ब्रिज (आरओबी) ओलांडत असताना नियंत्रण सुटलं आणि तो व्हॅनवर उलटला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले."