महिंद्राच्या शोरुमवाल्याने आधीच विकलेली आणि अपघात झालेली बोलेरो गळ्यात मारल्याची फसवणूक केल्याची तक्रार घेऊन आलेल्या तरुणाला मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी 'ऑन द स्पॉट' न्याय देऊन टाकला आहे. मोहन यादव यांनी त्या शोरुमच्या संचालकाला ४२० च्या केसमध्ये आत टाकण्याचा आदेश रतलामच्या एसपींना दिला आहे. यामुळे या तक्रारदार तरुणाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तरुणाने आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. परंतू, पोलिसांनी शोरुमवाल्यांवर काहीच कारवाई केली नव्हती. यादव हे दौऱ्यावर असताना त्याने आपला तक्रार अर्ज दिला. यावेळी यादव यांनी हे आदेश देत त्या अर्जावरही शेरा मारून कारवाई करण्यास सांगितले.
रतलामच्या भगवती शोरुमने त्याच्यासोबत ही फसवणूक केली होती. पुनमचंद असे या तरुणाचे नाव होते. या बोलेरो गाडीचा अपघात झाला होता. ती दुसऱ्या व्यक्तीला विकली होती. तीच गाडी या शोरुमने जादा पैसे घेऊन या तरुणाला विकली होती. फसवणूक झाल्याचे कळताच त्याने पोलिसांतही धाव घेतली होती. आता तेच पोलीस मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने या शोरुम चालकावर कारवाई करणार आहेत.