नवी दिल्ली - डिसेंबर २०२५ पर्यंत मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप बाजारात उपलब्ध होतील अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम २०२५ मध्ये केली आहे. ही घोषणा स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातही मोदींनी केली होती, ज्यात त्यांनी भारताला जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे म्हटले. सेमीकंडक्टर उत्पादन हे भारताच्या 'आत्मनिर्भर भारत' अभियानाचा एक भाग आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या दशकातील मॅक्रो-इकॉनॉमिक स्थिरतेमुळे आज भारत जागतिक अर्थव्यवस्थेत मजबूत स्थितीत आहे. भारत सेमीकंडक्टर, स्पेस आणि इलेक्ट्रिक व्हेइकल्स (ईव्ही) क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी तयार आहे. भारताची पहिली 'मेड इन इंडिया' सेमीकंडक्टर चिप यावर्षाच्या अखेरीस बाजारात येईल. भारत १०० देशांमध्ये ईव्ही निर्यात करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे सर्व भारताच्या नवीन पिढीच्या महत्वाकांक्षा दर्शवतात असं त्यांनी सांगितले.
तसेच आम्ही 'मेड इन इंडिया' ६जी वर वेगाने काम करत आहोत. भारत आधीच ५ जी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT) मध्ये जागतिक नेतृत्व घेण्यासाठी तयार आहे. भारताची डिजिटल क्रांती ग्रामीण आणि शहरी भागातील अंतर कमी करत आहे आणि लाखो लोकांसाठी नव्या संधी निर्माण करत आहे. टेलिकॉम क्षेत्र आता शहरी-ग्रामीण विभाजन कमी करून लाखो लोकांना जोडत आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
दरम्यान, स्पेस टेक्नॉलॉजी आता भारताच्या शासन व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनली आहे. ज्यामुळे सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा होत आहे. सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी भारतात २८ ते ९० नॅनोमीटर तंत्रज्ञान वापरून उत्पादन सुरू होईल, ज्यामुळे देशातील विदेशी गुंतवणूक वाढेल आणि उत्पादन क्षमता मजबूत होईल. भारत जगाला मंदीच्या स्थितीतून बाहेर काढू शकतो. पूर्वीच्या सरकारांनी तंत्रज्ञान क्षेत्राकडे दुर्लक्ष केले, पण आता भारत मिशन मोडमध्ये आहे. सेमीकंडक्टर आणि टेलिकॉममधील हे प्रगती भारताला जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवतील. भारताने मागील काही वर्षांत डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया यासारख्या योजनांद्वारे मजबूत पाया घातला आहे. आता ६जी आणि सेमिकंडक्टरसारख्या क्षेत्रात पुढे जाणे हे व्हिजन २०४७ च्या दिशेने महत्वाचे पाऊल आहे असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.