कांदे, बटाटे, भाज्या कडाडल्या असताना गॅस ग्राहकांना मोठा दिलासा; पण...

By कुणाल गवाणकर | Published: November 1, 2020 10:53 AM2020-11-01T10:53:03+5:302020-11-01T10:53:34+5:30

देशभरात सिलेंडरच्या किमती स्थिर; सर्व कंपन्यांकडून घोषणा

lpg gas cylinder price in india today indane gas bharat gas hp gas unchanged for november | कांदे, बटाटे, भाज्या कडाडल्या असताना गॅस ग्राहकांना मोठा दिलासा; पण...

कांदे, बटाटे, भाज्या कडाडल्या असताना गॅस ग्राहकांना मोठा दिलासा; पण...

Next

नवी दिल्ली: कांदा, बटाट्यासह भाज्यांच्या किमती कडाडल्या असताना सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. याआधी ऑक्टोबरमध्येही एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीनं घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणतेही बदल केलेले नव्हते. सध्या भाज्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. कांद्याच्या दरानंही सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. अशा परिस्थितीत सिलेंडरच्या किमती स्थिर असल्यानं जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. मात्र व्यवसायिक वापराच्या सिलेंडरच्या दरात ७८ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचे दर वाढू शकतात. याआधी जुलैमध्ये १४ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात ४ रुपयांची वाढ झाली होती. तर अनुदान नसलेल्या सिलेंडरचे दर दिल्लीत ११.५० रुपयांनी वाढले होते. 

...तर आजपासून तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही; जाणून घ्या नवे नियम

देशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी असलेल्या आयओसीनं संकेतस्थळावर सिलेंडरचे नवे दर प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये असलेले दर नोव्हेंबरमध्येही लागू असतील. मुंबईत बिगर अनुदानित सिलेंडरची किंमत ५९४ रुपये आहे. दिल्लीतही सिलेंडरचा दर ५९४ रुपयेच आहेत. चेन्नईत मात्र सिलेंडरसाठी ६१० रुपये मोजावे लागत आहेत. कोलकात्यात सिलेंडरचा दर ६२० रुपये इतका आहे.

आजपासून सिलेंडर, एसबीआय, डिजिटल पेमेंटचे नियम बदलणार; जाणून घ्या नवे नियम

नोव्हेंबरमध्ये व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. चेन्नईत सिलेंडरच्या किमतीत सर्वाधिक ७८ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सिलेंडरचा दर १ हजार ३५४ वर गेला आहे. मुंबई आणि कोलकात्यात सिलेंडरचा दर ७६ रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे मुंबईत सिलेंडरसाठी १ हजार १८९ रुपये, तर कोलकात्यात १ हजार २९६ रुपये मोजावे लागतील. दिल्लीत व्यवसायिक सिलेंडरचा दर १ हजार २४१ रुपये आहे.

Web Title: lpg gas cylinder price in india today indane gas bharat gas hp gas unchanged for november

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.