तोतया पोलिसांकडून वृद्धांची लूट सुरूच
By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST
घटनांमध्ये वाढ : वृद्ध नागरिकांमध्ये घबराट
तोतया पोलिसांकडून वृद्धांची लूट सुरूच
घटनांमध्ये वाढ : वृद्ध नागरिकांमध्ये घबराट नाशिक : शहरात खर्या पोलिसांऐवजी तोतया पोलीसच वरचढ ठरत असून, वृद्धांना टारगेट करून पोलिसी धाक दाखवून लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ चार दिवसांपूर्वी एकाच दिवसात तीन ठिकाणी वृद्ध नागरिकांची तोतया पोलिसांनी लूट केल्याची घटना घडली होती़ मेडिकलमध्ये औषधे खरेदीसाठी गेलेल्या वृद्धेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तोतया पोलिसांनी लांबविल्याची घटना सद्गुरुनगरमध्ये घडली असून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ न्यू तिडके कॉलनीतील राजगुरुनगर येथील रहिवासी लताबाई जयंतीलाल मकवाना या वृद्धा सद्गुरुनगरमधील एका मेडिकलमध्ये औषधे खरेदीसाठी पायी जात होत्या़ त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना थांबवत पोलीस असल्याची बतावणी केली़ शहरात चोर्या वाढल्या असून अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगितले़ त्यानुसार त्यांनी हातातील सोन्याच्या बांगड्या, सोन्याची चेन, डायमंड रिंग असे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पदराला बांधून देण्याचा बहाणा करीत लंपास केले़ या प्रकरणी जितेंद्र मकवाना यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे़यापूर्वी शुक्रवारी (दि़३१) दुपारी एक वाजेच्या सुमारास गंगापूररोडवरील नेर्लिकर हॉस्पिटलजवळील रेवतीकुंज अपार्टमेंटमध्ये राहणार्या कमल दिनकरराव मोगल (६७) या अपार्टमेंटसमोर उभ्या होत्या़ त्यावेळी तेथे आलेल्या दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून गुरुवारी रात्री या ठिकाणी एका आजीला चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली आहे़ त्यामुळे तुम्ही अंगावरील दागिने रुमालात बांधून घरी जा, असा सल्ला दिला़ यानंतर कमल मोगल यांची गळ्यातून काढलेली पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची माळ रुमालात बांधून देण्याचा बहाणा करून लंपास केली़ विहितगाव रोडवरील लॅमरोड परिसरातील लक्ष्मीशांती अपार्टमेंटमध्ये राहणार्या लीलाबेन कर्सन रंगनानी (५८) या शुक्रवारी (दि़३१) सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास लॅमरोडवरील सौभाग्यनगररोडने जात असताना तीन इसमांनी त्यांना थांबविले़ पोलीस असल्याची बतावणी करीत पुढे एका महिलेचा खून झाल्याचे सांगून गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून ठेवण्यास सांगितले़ रंगनानी यांनी काढून ठेवलेले गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र रुमालात ठेवण्याचा बहाणा करीत तोतया पोलिसांनी लंपास केले़ दरम्यान शहरात तोतया पोलिसांपुढे खर्या पोलिसांनी हात टेकल्याचे चित्र असून या तोतया पोलिसांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे़ (प्रतिनिधी) --कोट-- शहरात काही गुन्हेगार वृद्धांना टारगेट करून पोलीस असल्याची बतावणी करतात, तसेच खोटे पोलीस ओळखपत्रही दाखवितात़ यानंतर अंगावरील दागिने व मौल्यवान वस्तू काढून ते ठेवून देण्याच्या बहाण्याने लंपास करतात़ मुळात कोणताही पोलीस अधिकारी ओळखपत्र दाखवून दागिने काढून ठेवण्याची विनंती करीत नाही़ असा प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. - एस़जगन्नाथन, पोलीस आयुक्त, नाशिक