दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांच्याशी झालेल्या गैरवर्तनावरून सध्या आम आदमी पक्षाची चांगलीच कोंडी झालेली आहे. लखनौमध्ये आज सकाळी सपा आणि आप यांच्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्येही स्वाती मालिवाल यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नामुळे अरविंद केजरीवाल यांची अडचण झाल्याचे दिसून आले. या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय होईल, असा दावा केला. मात्र स्वाती मालिवाल यांच्याशी झालेल्या गैरवर्तनाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी मौन बाळगणे पसंद केले. तर यापेक्षा अधिक महत्त्वाचे मुद्दे आहेत, असे सांगत अखिलेश यादव यांनी हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला.
स्वाती मालिवाल यांच्या प्रश्नावरून दोन्ही नेत्यांची अडचण झाली असताना संजय सिंह यांनी माईक सांभाळला. तसेच या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या भाजपावरच प्रश्व उपस्थित केले. मणिपूरपासून ते प्रज्वल रेवण्णांपर्यंतच्या प्रश्नावर भाजपानं उत्तर दिलं पाहिजे, असे संजय सिंह यांनी सांगितले.
संजय सिंह म्हणाले की, आम आदमी पार्टी आमचं कुटुंब आहे. पार्टीने आपली बाजू मांडली आहे. देशातील जेवढे मुद्दे आम्ही उपस्थित केले आहेत, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपानं उत्तर दिलं पाहिजे. स्वाती मालिवाल ह्या जेव्हा कुस्तीपटूंशी चर्चा करण्यासाठी जंतर मंतर येथे गेल्या होत्या, तेव्हा त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आलं होतं. भाजपानं यावर उत्तर दिलं पाहिजे. दरम्यान, स्वाती मालिवाल यांच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय सिंह यांनी सांगितले की, याप्रकरणी राजकारणात करता कामा नये, भाजपानं मणिपूरवरून उत्तर दिलं पाहिजे, अशी मागणी संजय सिंह यांनी केली.
संजय सिंह म्हणाले की, मणिपूरमध्ये जे काही घडलं, ते पाहून संपूर्ण देशाला वेदना झाल्या होत्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुद्द्यावर मौन बाळगून होते. प्रज्ज्वल रेवण्णा यांनी हजारो महिलांवर बलात्कार केला. मात्र नरेंद्र मोदी प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यासाठी मतं मागत होते. जेव्हा आमचे कुस्तीपटू जंतर मंतरवर आंदोलन करत होते. तेव्हा डीसीडब्ल्यूच्या तत्कालीन प्रमुख स्वाती मालिवाल यांना पोलिसांनी मारहाण केली होती. मात्र या मुद्द्यावर नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले. आम आदमी पक्ष हे आमचं कुटुंब आहे. तसेच आम्ही त्यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे. भाजपा आणि नरेंद्र मोदी यांनी मी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर उत्तरं दिली पाहिजेत. स्वाती मालिवाल यांच्या मुद्द्यावर राजकारण होता कामा नये, असं आवाहन संजय सिंह यांनी केलं.