नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा (कोविड-१९) फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या दिवसांत दारूच्या दुकानांवरील गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारांनी आॅनलाईन आणि घरपोच सेवेचा विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले.
न्यायमूर्ती अशोक भूषण, संजय किशन कौल आणि बी.आर. गवई यांच्या खंडपीठाने हा विषय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विचारात घेतला. १ मे रोजी गृहमंत्रालयाने लॉकडाऊनच्या दिवसांत मद्याची थेट विक्री करण्यास दिलेल्या मार्गदर्शक सूचनांना आव्हान देणारी याचिका खंडपीठाने फेटाळली. लॉकडाऊनच्या दिवसांत थेट संपर्क येणार नाही, अशा किंवा होम डिलिव्हरीचा किंवा ऑनलाईन मद्यविक्रीचा राज्यांनी विचार करावा, असा आदेश खंडपीठाने दिला, असे याचिकाकर्ते गुरुस्वामी नटराज यांचे वकील साई दीपक यांनी सुनावणीनंतर सांगितले.
सुनावणीत नटराज यांनी युक्तिवाद केला की, देशातील ७० हजार मद्यविक्रेते आणि मद्यविक्रीची दुकाने असून, आजपर्यंत या दुकानांतून पाच कोटी लोकांनी मद्याची खरेदी केली आहे. या दोन्ही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन होत नाही. साई दीपक म्हणाले की, देशभर गेल्या महिनाभरापासून लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे जे काही यश प्राप्त झाले आहे, ते कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्यामुळे नष्ट होईल.