लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेच्या लेकीची तिच्याच जोडीदाराने हत्या केल्याची धक्कादायक घटना हरियाणामधील रेवाडी जिल्ह्यात घडली आहे. या महिलेसोबत झालेल्या भांडणानंतर संतापलेल्या तिच्या लिव्ह इन पार्टनरने रागाच्या भारात तिच्या पाच वर्षांच्या मुलीचा जीव घेतला. या प्रकरणी आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत रेवाडी पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, हत्येचा आरोप असलेला रोशन हा बिहारमधील रहिवासी होता. आरोपी रोशन हा एक विवाहित महिला आणि तिच्या मुलीसह भाड्याच्या घरात राहत होता. बुधवारी काही कारणावरून रोशन आणि त्याची लिव्ह इन पार्टनर असलेल्या महिलेसोबत भांडण झालं. त्यानंतर महिला रागाने रेल्वे स्टेशनवर गेली. तर रोशन घरी निघून आला.
रोशन घरी आला तेव्हा या महिलेची पाच वर्षांची मुलगी घरी होती. ती तिच्या आईला हाका मारत होती. तसेच रोशन याला आपल्या आईकडे घेऊन जाण्यास सांगत होती. मात्र रोशननं तिच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे ही मुलगी रडू लागली. त्यामुळे संतापलेल्या रोशन याने या मुलीला रागाच्या भरात जमिनीवर आपटले. त्यामुळे गंभीर मार बसून या मुलीचा जागीच मृत्यू झाला.
मुलीचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शोध सूरू करून आरोपी रोशन यााला बेड्या ठोकल्या. याबाबत अधिक तपास सुरू आहे.