Pahalgam Terrorist Attack: जम्मू आणि काश्मीर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या हल्ल्याने हादरले आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे म्हटलं जात असलं तरी दोन पर्यटकांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. तर १० पर्यटक आणि २ स्थानिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.
मंगळवारी साडेतीनच्या सुमारास अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य केले. या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची भीती आहे. हा हल्ला बैसरन या गवताळ प्रदेशाजवळ झाला. दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची संलग्न संघटना आहे. पाकिस्तानमधील शेख सज्जाद गुल हा टीआरएफचे प्रमुख आहे.
दोन ते तीन दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात होती. पर्यटकांना लक्ष्य करण्यासाठी त्यांनी हा हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावे विचारल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. हल्ल्यानंतर गोंधळ उडताच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
टीआरएफ ही दहशतवादी संघटना २०१९ मध्ये सुरु आली. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवताच ही संघटना संपूर्ण काश्मीरमध्ये सक्रिय झाली. पण थोड्याच वेळात या दहशतवादी संघटनेने डझनभर दहशतवादी हल्ले केले. २०२३ मध्ये बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत टीआरएफ दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. टीआरएफची निर्मिती पाकिस्तानपासून सुरू होते. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबा यांनी मिळून 'द रेझिस्टन्स फ्रंट' या नवीन दहशतवादी संघटनेचा पाया रचला होता.
जम्मू आणि काश्मीरमध्ये टीआरएफ केलेल्या प्रत्येक हल्ल्यानंतर एक पत्र जारी करते. त्यानुसार पहलगाम हल्ल्यातही दहशतवादी संघटनेने असेच एक पत्र जारी केले आहे. "जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांना डोमिसाईल जारी केला जात आहे. हा प्रयत्न जम्मू आणि काश्मीरची लोकसंख्या खराब करण्याचा आहे. स्थानिक नसलेले लोक तिथे येतात आणि स्वतःची पर्यटक म्हणून ओळख सांगतात आणि डोमिसाईल मिळवतात. त्यानंतर तिथे जमीन ताब्यात घेण्याचा खेळ सुरू होतो," असे सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र टीआरएफकडून या पत्राची अधिकृत घोषणा झालेली नाही.
"जम्मू आणि काश्मीरमध्ये ८५ हजारांहून अधिक डोमिसाईल जारी करण्यात आले आहेत. हे डोमिसाईल स्थानिक लोकांना नाही तर बाहेरील लोकांना देण्यात आले आहे. याद्वारे जम्मू-काश्मीरची लोकसंख्या खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे दहशतवादी हल्ले जम्मू आणि काश्मीरमध्ये बेकायदेशीरपणे लोकांना वसवण्याच्या प्रयत्नांचे परिणाम आहेत," असे टीआरएफने म्हटलं आहे.