जिद्द आणि मेहनत करायची तयारी असेल तर स्वप्नं देखील सत्यात उतरतात. अशीच प्रेरणादायी गोष्ट शाहजहांपूरच्या तिलहर शहरातील इमली मोहल्ला येथील रहिवासी शकील अहमद यांची आहे. शकील अहमद यांचे वडील एकेकाळी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजूर म्हणून काम करायचे. आज त्यांच्या मुलाने आयपीएस होऊन यशाचं शिखर गाठलं आहे. शकील यांनी यूपीएससीमध्ये ५०६ वा रँक मिळवला आहे. मंगळवारी जेव्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर केला तेव्हा शकील यांच्या कुटुंबाला फार आनंद झाला.
हाजी तसब्बर हुसेन यांना सहा मुलं आणि तीन मुली आहेत. मोठं कुटुंब असल्याने तसब्बर पोटरगंज मार्केटमध्ये काम करायचे. हळूहळू मुलं मोठी झाली आणि त्यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वतःवर घेतली. शकील यांचे भाऊ सगीर म्हणाले की, आमच्यापैकी कोणातरी एकाने शिक्षण घ्यावं आणि मोठं नाव करावं हे संपूर्ण कुटुंबाचं स्वप्न होतं.
सर्व भाऊ आणि बहिणी अभ्यास करत होते पण शकील सर्वात हुशार होता. या कारणास्तव सर्वांनी त्याला शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. शकील यांनी तिलहार येथील केंब्रिज स्कूलमधून आठवीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर शाहजहांपूरच्या तक्षशिला पब्लिक स्कूलमधून नववी आणि दहावीचं शिक्षण घेतलं. बी.टेक पूर्ण केल्यानंतर शकील दिल्लीला गेले.
शकील यांनी जामिया कॅम्पसमध्ये राहून यूपीएससीची तयारी सुरू केली. त्यांना चौथ्या प्रयत्नात यश मिळालं. दोनदा मुख्य परीक्षेत आणि एकदा मुलाखतीत अपयशी ठरल्यानंतरही शकील यांनी हार मानली नाही. चौथ्या प्रयत्नात ते आयपीएस होण्यात यशस्वी झाले.
शकील यांनी दिल्लीहून फोनवरून आपल्या कुटुंबाला आयपीएस झाल्याचं सांगितलं तेव्हा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. लोकांना माहिती मिळताच, कुटुंबाचं अभिनंदन करण्यासाठी लोकांची त्याच्या घरी रांग लागली. शकीलला नेहमीच देशाची सेवा करायची होती. आज त्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे असं भाऊ सगीर यांनी म्हटलं.