मुंबई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे लिहिणाऱ्या कुणाल कामराला ७ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालं आहे. त्यात आता कुणाल कामराच्या वकिलाची प्रतिक्रिया समोर आली आहे. जेव्हा वादग्रस्त व्हिडिओ रिलीज झाला त्याआधीच कुणाल कामरा तामिळनाडू पोहचला होता. त्याठिकाणी रेकॉर्डिंग सुरू होते. त्यामुळे तो पळाला असं बोलू शकत नाही असं वकिलाने म्हटलं.
पीटीआयशी बोलताना कुणाल कामराचे वकील म्हणाले की, आम्ही मद्रास हायकोर्टात गेलो होतो तिथे आम्ही अंतरिम जामीनाची मागणी केली होती. सध्याच्या परिस्थितीत मुंबई पोलिसांसमोर हजर राहणे शक्य नाही. तिथली परिस्थिती चांगली नाही. व्हिडिओ रेकॉर्डिंग फेब्रुवारीला झालं होते. ते २३ मार्च रोजी पोस्ट झाले. व्हिडिओ पोस्ट होण्यापूर्वीच कुणाल कामरा तामिळनाडूला आला होता, इथं त्याचे रेकॉर्डिंग सुरू होते. या परिस्थितीत सुप्रीम कोर्टानेही ते अंतरिम जामीनासाठी पात्र आहेत हे मान्य केले. कशाप्रकारे धमक्या मिळत आहेत हे आम्ही कोर्टाला दाखवले. हे सर्व लक्षात ठेवले आहे. या उघड धमक्या आहेत. सर्वांना माहिती आहे ते कोण देतंय, कुणाकडून लपलं नाही असं त्यांनी सांगितले.
तर आमचं म्हणण कोर्टाने ऐकले आणि ७ एप्रिलपर्यंत कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण दिले. महाराष्ट्रात ३ वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर दाखल झालेत, त्या तिन्ही खार पोलीस ठाण्यात ट्रान्सफर केलेत हे आम्हाला कळलं. हायकोर्टाच्या सांगण्यांनुसार, आम्ही मुंबई पोलिसांना नोटीस ईमेलद्वारे पाठवली आहे. त्यात याचिका आणि त्याच्याशी निगडीत कागदपत्रे कोर्टात सादर केलेत. आम्ही तामिळनाडू आणि मुंबई पोलिसांना पक्षकार बनवलं असून त्यांना ७ एप्रिलला कोर्टात येण्यास सांगितले असल्याचं वकीलांनी माहिती दिली.
संजय राऊतांचा भाजपावर निशाणा
दरम्यान, कुणाल कामराच्या समर्थनार्थ उभं राहत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. २०२० मध्ये ज्याप्रकारे कंगना राणौतला सुरक्षा देण्यात आली होती तशीच कुणाल कामरालाही केंद्र सरकारने सुरक्षा दिली पाहिजे. कुणाल कामरासारखं काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांच्याविरोधातला एक FIR सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. कोर्टाचा आदेश सकारात्मक आहे. भारतीय न्यायव्यवस्था कलाकार आणि सर्वसामान्य व्यक्तींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहेत असं कोर्टाच्या निकालातून दिसते असं संजय राऊत यांनी म्हटलं.