लडाखमधील गलवान खोऱ्यातील चारबाग भागात असलेल्या फायरिंग रेंजकडे लष्कराचे एक पथक जात असताना अचानक भूस्खलन झालं. लष्करी वाहनावर जड दगड पडले, ज्यामुळे हिमाचलचे लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप सिंह मनकोटिया आणि गुरदासपूरचे रहिवासी लान्स दफादार दलजीत सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात इतर तीन अधिकारी गंभीर जखमी झाले.
३३ वर्षीय लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप सिंह मनकोटिया हे मूळचे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील शाहपूर विधानसभा मतदारसंघातील होते. सध्या ते पठाणकोटच्या अब्रोल नगरमध्ये त्यांच्या कुटुंबासह राहत होते. त्यांना व्योम नावाचा दीड वर्षांचा मुलगा देखील आहे. त्यांनी भारतीय सैन्याच्या १४ व्या हॉर्स रेजिमेंटमध्ये सेवा बजावली आणि अलीकडेच जून २०२५ मध्ये त्यांना लेफ्टनंट कर्नल पदावर बढती मिळाली.
भानु प्रताप सिंह यांनी सुरुवातीचं लष्करी शिक्षण देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकादमी (आयएमए) येथून घेतलं. प्रशिक्षणादरम्यान, त्यांना त्यांच्या अद्वितीय प्रतिभेसाठी आणि नेतृत्व क्षमतेसाठी स्वॉर्ड ऑफ ऑनर आणि सुवर्णपदक सारखे सर्वोच्च लष्करी सन्मान मिळाले. हा पुरस्कार कोणत्याही कॅडेटसाठी सर्वात मोठा अभिमान आहे.
या अपघातानंतर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू आणि उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला आणि शहीदांना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्र्यांनी देश नेहमीच या वीरांचा ऋणी राहील असं म्हटलं. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.