Kerala Madrasa Teacher Rapecase: केरळमधीलन्यायालयाने मदरशातील शिक्षकाला तब्बल १८७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका मदरशाच्या शिक्षकाला न्यायालयाने शिक्षा ही सुनावली आहे. आरोपीने कोविड काळापासून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले होते. यासोबतच न्यायालयाने आरोपीला ९ लाख रुपयांचा दंडही ठोठावला. आरोपीला दिलेल्या या शिक्षेची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
आरोपी शिक्षकाचे नाव मोहम्मद रफी आहे आणि त्याचे वय ४१ वर्षे आहे. कोविड-१९च्या काळात आरोपी रफीने एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचे दोन वर्षांहून अधिक काळ लैंगिक शोषण केल्याचे न्यायालयाने आढळून आले. शिक्षा सुनावताना न्यायालयाने अशा गुन्हेगारांना समाजात राहण्याचा अधिकार नाही, असेही म्हटलं. कन्नूर जिल्ह्यातील या खळबळजनक प्रकरणात तालिपरंबा पोक्सो न्यायालयाने आरोपीला १८७ वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा दिली.
विविध गुन्ह्यात शिक्षा
मौलाना मोहम्मद रफीला वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या शिक्षा दिल्या. पोक्सो कायद्याच्या कलम ५(टी) अंतर्गत ५० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. आयपीसीच्या कलम ३७६(३) अंतर्गत २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. आयपीसीच्या कलम ५०६(२) अंतर्गत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तर पोक्सो कायद्याच्या कलम ५(१) आणि ५(एफ) अंतर्गत ३५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. लैंगिक अत्याचारासाठी २० वर्षांची आणि जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
मार्च २०२० मध्ये आरोपी रफीने मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ती मुलगी १४ वर्षांची होती. २०२१ पर्यंत हा सगळा धक्कादायक प्रकार सुरु होता. याबद्दल कोणालाही सांगू नको अशी धमकी आरोपीने दिली होती. मात्र मुलीच्या वागण्यात बदल झाल्याने आणि तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित येऊ न लागल्याने पालकांना संशय आला. त्यांनी तिला एका समुपदेशन केंद्रात नेले आणि तिथे हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, आरोपी रफीला यापूर्वी कन्नूर जिल्ह्यातील एका मदरशात आणखी एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याबद्दलही दोषी ठरवण्यात आले होते. पॅरोलवर बाहेर असतानाच त्याने दुसरा गुन्हा केला. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली.