Kerala Crime: केरळच्या कोझिकोड एका व्यावसायिकाने सासऱ्याची फसवणूक करण्यासाठी रचलेल्या दरोड्याच्या कटाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. व्यावसायिकाने त्याच्या कारमधून ४० लाख रुपये चोरीला गेल्याची तक्रार केली होती. मात्र पोलिसांच्या तपासानंतर सासऱ्याला फसवण्यासाठी दरोड्याचं खोटं नाटक रचण्यात आल्याचे समोर आलं. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी हा सगळा बनाव समोर आणला. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक करुन पुढील चौकशी सुरु केली आहे. पीएम राहीस, साजिद उर्फ शाजी आणि जमशेद अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कोझिकोड जिल्ह्यातील कुट्टीकत्तूरमध्ये ४० लाख रुपयांच्या चोरीच्या प्रकरणात मुख्य संशयिताने सासऱ्याची फसवणूक करण्यासाठी बनावट चोरीचा कट रचल्याचे समोर आलं. पीएम राहीस मयंकोत्तुचलील (३५) असं जावयाचे नाव आहे. त्याने कारमधून ४० लाख रुपये चोरीला गेल्याचे सांगितले होते. मात्र पोलिसांच्या तपासात सासरच्या मंडळींना पैसे द्यायला लागू नये म्हणून जावयानेच दरोड्याचे नाटक केले होते.
२० मार्च रोजी राहिसने त्याच्या कारमध्ये ठेवलेले ४०,२५,००० रुपये खाजगी रुग्णालयाच्या पार्किंगमधून चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. चोरट्यांनी कारची काच फोडली आणि गोणीत एका बॉक्समध्ये ठेवलेले ४० लाख आणि डॅशबोर्डमधून २५ हजार चोरल्याचे राहिसने सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हेल्मेट घातलेले दोघे कारच्या काचा फोडत असल्याचे दिसून आले. त्यानंतर कारमधील आतील एक बॉक्स काढून ते पळून गेले.
पोलिसांनी दुचाकीचा शोध घेतला असता नंबर प्लेट बनावट असल्याचे आढळून आले. बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांनी दुचाकी शोधून काढली आणि साजिद उर्फ शाजी आणि जमशेद या दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान राहिसने त्यांना दरोड्याची योजना आखण्यास सांगितल्याचे दोघांनी सांगितले. साजिदने पोलिसांना सांगितले की कारमधून चोरलेल्या वस्तू राहिसने सांगितल्याप्रमाणे नव्हत्या. कारच्या मागच्या सीटमध्ये एक बॉक्स आणि बॅग होती पण त्यात पैसे नव्हते. यानंतर राहिसला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यानंतर राहिसने हा बनावट दरोडा असल्याचे कबुल केलं.
बंगळुरूमधल्या फर्ममध्ये मॅनेजर असलेल्या राहिसच्या सासऱ्यांनी त्याला एकूण ४० लाख पाठवले होते. ही रक्कम कंपनीच्या केरळमधील शाखेमध्ये जमा करायची होती. मात्र, राहिसने हे पैसे खर्च केले होते. जेव्हा त्याच्या सासरच्यांनी पैसे परत मागितले तेव्हा तो पैसे परत करू शकला नाही. हताश होऊन त्याने बनावट दरोड्याची योजना आखली होती. मात्र पोलिसांच्या तपासात त्याची पोलखोल झाली.