नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेतील अभूतपूर्व विजयानंतर आम आदमी पार्टीचे नेते ४६ वर्षीय अरविंद केजरीवाल आज शनिवारी ऐतिहासिक रामलीला मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील.केजरीवाल दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असून, त्यांचे निकटस्थ सहकारी पटपडगंजचे आ. मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्री बनतील. या वेळी मंत्रिमंडळात गोपाल राय, जितेंद्र तोमर, संदीप कुमार, सत्येंद्र जैन व असीम अहमद खान यांच्यासारख्या नव्या चेहऱ्यांना स्थान मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. वर्षभरानंतर केजरीवाल यांच्या शपथविधीसाठी रामलीला मैदान पुन्हा सजले आहे. ‘आप’ समर्थकांची या वेळी वाढणारी गर्दी विचारात घेता सुरक्षा बंदोबस्तासाठी १,२०० पोलीस व अधिकाऱ्यांचा ताफा तैनात असेल.