Pahalgam Terror Attack: पहगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निष्पाप लोकांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सरकारने या हल्ल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. देशभरातही पाकिस्तानविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र उत्तराखंडमध्ये जम्मू काश्मीरमधील विक्रेत्यांना टार्गेट केले गेले आहे. स्थानिकांनी मारहाण केल्याने आणि धमकावल्याने व्यवसायासाठी आलेल्या काश्मिरी विक्रेत्यांनी उत्तराखंड सोडले आहे. आम्हाला कोणीही सहकार्य केले नाही, असे शाल विक्रेत्यांनी सांगितले.
मसूरीमध्ये काश्मिरी शाल विक्रेत्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये काही लोक मसुरीतील मॉल रोडवर शाल विकणाऱ्या काश्मिरी विक्रेत्यांना मारहाण करताना दिसत आहेत. एका व्यक्तीने शिवीगाळ करत जर तू मला इथे परत दिसला तर मी तुझे तुकडे करीन, अशी धमकीही दिली. त्यानंतर कारवाई करुन पोलिसांनी तिघांना अटक केली. मात्र काश्मिरी तरुणांनी मसूरी सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून उत्तराखंडमधील मसुरीमध्ये काश्मिरी नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे १६ काश्मिरी शाल विक्रेते मसुरी सोडून गेले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर २३ एप्रिल रोजी मसुरीमध्ये दोन काश्मिरी दुकानदारांवर हल्ला करण्यात आला होता. त्यांना तिथून परत जाण्यास सांगण्यात आले होते. त्यांना त्याचे ओळखपत्रही दाखवण्यास सांगण्यात आले. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथील विक्रेता शब्बीर अहमद दार यांनी सांगितले की ते गेल्या १८ वर्षांपासून मसुरीला येत आहेत. "मी मशिदीजवळ राहतो आणि स्थानिक लोकांना बऱ्याच काळापासून ओळखतो. ज्यांनी माझ्यावर हल्ला केला ते देखील त्याच भागातील होते. कोणीही त्यांना पाठिंबा दिला नाही. काश्मीरमध्येही इतर राज्यांतील अनेक कामगार आहेत, पण मी त्यांच्यासोबत कधी असे केले नाही. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर रात्री ११ वाजता पोलीस माझ्या घरी आले होते. पोलिसांनी मला सांगितले की ते यामध्ये मदत करू शकत नाहीत. कारण पहलगाम हल्ल्यानंतर काश्मिरींना धमकावले जात आहे आणि त्यांच्यासाठी परत जाणेच योग्य आहे," असे शब्बीर अहमद दार म्हणाले.
यानंतर शब्बीर याच्या भावाने काश्मीरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर अधिकाऱ्याने स्थानिक पोलिसांसोबत संवाद साधला. त्यावेळी मसुरी पोलिसांनी जर काही झाल तर ते त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाहीत, असे काश्मिरी अधिकाऱ्याला सांगितले. यानंतर, शब्बीर आणि त्यांच्या भावाने मसुरी सोडली. शब्बीर यांच्या एका साथीरादाराने सांगितले की त्याचा १२ लाख रुपयांचा माल तिथेच सोडून जावं लागले आहे.