Farooq Abdullah: जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि इथल्या लोकांनी कधीही दहशतवादाचे समर्थन केलेलं नाही, असं फारुख अब्दुल्ला म्हणाले. यावेळी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केलेल्या विधानावरही फारुख अब्दुल्लांनी भाष्य केले. मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला मी उत्तर दिले तर ते चांगले होणार नाही, असे अब्दुल्ला म्हणाले. यावेळी मेहबूबा मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जात असत असाही आरोप फारुख अब्दुल्लांनी केला आहे.
स्थानिक पाठिंब्याशिवाय पहलगाम दहशतवादी हल्ला होऊ शकला नसता. कारण दहशतवादी तिथे कसे पोहोचले, हा प्रश्न अजूनही कायम आहे. कोणीतरी स्थानिकांनी त्याला मदत केली असावी, असं फारुख अब्दुल्ला म्हणाले होते. त्यावर मेहबूबा मुफ्ती यांनी आक्षेप घेत अब्दुल्ला यांच्या अशा विधानामुळे देशाच्या इतर भागात राहणाऱ्या काश्मिरी लोकांसाठी धोका निर्माण होऊ शकतो, असं म्हटलं होतं. त्यावर आता फारुख अब्दुल्लांनी मुफ्तींवर गंभीर आरोप केला आहे.
"मेहबूबा मुफ्ती जे काही बोलतात त्याला मी उत्तर दिले तर ते चांगले दिसणार नाही. मी फक्त एवढंच म्हणेन की अशा गोष्टी बोलू नका. ३४ वर्षे झाली. हे कोणी सुरू केले? बाहेर जाणारे आणि परत येणारे ते लोक कोण होते? आमच्या पंडित बांधवांना येथून हाकलून लावणारे कोण होते? याचे उत्तर द्या. त्या (मेहबूबा मुफ्ती) अशा ठिकाणी जायच्या जिथे मी जाऊ शकत नव्हतो. त्या दहशतवाद्यांच्या घरी जायच्या. आम्ही कधीही दहशतवादाशी संबंधित नव्हतो, पाकिस्तानी नव्हतो, आताही नाही आणि कधीही राहणार नाही. आम्ही भारताचा अविभाज्य भाग आहोत आणि काश्मीर हा भारताचा मुकुट आहे. अमरनाथजी येथे आहेत आणि ते आमचे रक्षण करतील," असं फारुख अब्दुल्ला म्हणाले.
"मी शहीद पर्यटकांच्या कुटुंबियांना सांगू इच्छितो की आम्हीही तुमच्याइतकेच रडलो आहोत. मानवतेचा नाश करणारे असे क्रूर लोक अजूनही अस्तित्वात आहेत हे विचार करून आम्हालाही झोप येत नव्हती. या हल्ल्याचा निश्चितच बदला घेतला जाईल. दहशतवाद्यांना वाटते की ते पहलगाम हल्ल्यात जिंकतील पण ते कधीही जिंकणार नाहीत," असेही फारुख अब्दुल्ला म्हणाले.
मी म्हटलं होतं, मौलाना अझहरला सोडू नका
"१९९९ मध्ये जेव्हा भारताने मौलाना मसूद अझहरला सोडले तेव्हा मी त्याला सोडू नका असे सांगितले होते, पण कोणीही माझे ऐकले नाही. अझहरला काश्मीर माहिती आहे. तो आता यशस्वी झाला आहे आणि त्याने आपले रस्ते तयार केले आहेत. पहलगाम हल्ल्यातही त्याचा हात असू शकतो कोणाला माहिती, असेही फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं.