मुंबई : कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा चालक असलेले मरिअप्पा उप्पार (५0) हे बेपत्ता झाले आहेत. नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले मरिअप्पा हे गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असून याबाबत आग्रीपाडा पोलीस स्थानकात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. ३ सप्टेंबर रोजी बेळगाव-मुंबई या साध्या बसवर कार्यरत असलेले मरिअप्पा बस घेऊन रात्री साडेआठ वाजता निघाले. ४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई सेन्ट्रल येथे त्यांच्या बसचे आगमन झाले. त्यानंतर मुंबई सेन्ट्रल येथील चालक विश्रांतीगृहातील बाथरूममध्ये गेले असता तेथे चक्कर येऊन पडले. त्यावेळी अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना नायर रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक चाचणीनंतर त्यांना रुग्णालयाच्या सातव्या मजल्यावरील वॉर्ड क्रमांक २२ मध्ये दाखल केले. सोबतचे कर्मचारी त्यांच्या सीटी स्कॅनचे पैसे भरण्यासाठी रुग्णालयाच्या खालच्या मजल्यावर आले आणि तासाभराने पुन्हा वॉर्डमध्ये गेले असता मरिअप्पा जागेवर नव्हते. बराच वेळ झाल्यानंतर ते न परतल्याने त्यांच्या शोध घेण्यात आला. अखेर याबाबत आग्रीपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आल्याचे एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती मिळाल्यास बेळगांव विभागाचे ्रकामगार अधिकारी पी. एच. तुकाराम यांच्या 0७७६0९९१६ या मोबाइलवर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)
कर्नाटक एसटीचा चालक बेपत्ता
By admin | Updated: September 11, 2014 03:26 IST