बंगळुरू: कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस)च्या सत्ताधारी आघाडीतील १३ आमदारांनी शनिवारी राजीनामा दिल्याने आधीपासूनच डामाडौल अवस्थेत असलेले एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. या घडामोडींनी कर्नाटकचे राजकारण हातघाईवर आले असून, सरकार वाचविण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी तर संधी मिळताच सत्तेची खुर्ची बळकाविण्यासाठी भाजपचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत.
राजीनामे दिलेल्या आमदारांना राज्यपालांच्या भेटीनंतर मिनीबसमध्ये बसवून विमानतळावर नेण्यात आले. तेथून त्यांना चार्टर्ड विमानाने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नेण्यात आले. राहुल गांधी यांच्या पदत्यागाने नेतृत्वहीन झालेल्या काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीमध्ये कर्नाटकमधील या घटनांवर चर्चा करून परिस्थिती सावरण्यासाठी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना बंगळुरूला रवाना केले.
राजीनामा देणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे नऊ तर जद(एस)च्या तीन आमदार आहेत. विजयनगरचे आमदार आनंद सिंग यांनी या आठवड्याच्या सुरुवातीलाच राजीनाम्याची घोषणा केली होती. राज्यपालांकडून या सर्व आमदारांचे राजीनामे स्वीकारले गेल्यास कर्नाटकमधील सरकारचे पडू शकते. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडुराव हे दोघेही राज्यात नसताना हा राजकीय भूकंप घडला. महत्त्वाचे म्हणजे कुमारस्वामी यांच्या सरकारला सत्तेत येऊन केवळ १३ महिने उलटले आहेत. सध्या अमेरिकेत असलेले मुख्यमंत्री कुमारस्वामी रविवारी राज्यात परत येणार आहेत. मात्र, गुंडुराव ब्रिटनहून केव्हा परतणार हे नक्की नाही.