बंगळुरू : सध्या अनेक घटनांमुळे कर्नाटक चर्चेत येत आहे. हिजाब आणि हलाल प्रकरणानंतर आता कर्नाटकात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. येथील मुस्लिम व्यावसायिकांवरही मंदिराबाहेर हल्ले होऊ लागले आहेत. दरम्यान, मंदिरासमोरील मुस्लिम व्यापाऱ्यांच्या दुकानांची तोडफोड झाल्याची घटना समोर आल्यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी चिंता व्यक्त केली आहे.
मुस्लिमांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायांना लक्ष्य करण्याऱ्या हिंदू संघटनांच्या मोहिमेवर त्यांनी टीका केली आहे. मुस्लिमांना शांततेने आणि सन्मानाने जगू द्या, असे येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. दरम्यान, येडियुरप्पा यांनी हे विधान श्री राम सेनेच्या चार कथित सदस्यांनी धारवाडमध्ये मुस्लिम समाजातील फळ विक्रेत्यांच्या गाड्यांची तोडफोड केल्यानंतर केले आहे. तसेच, हिंदुत्ववादी संघटनांना अशा कारवाया थांबवण्याचे आवाहन येडियुरप्पा यांनी केले आहे.
येडियुरप्पा म्हणाले, "हिंदू आणि मुस्लिम एकाच आईची मुले म्हणून एकत्र राहावे अशी माझी इच्छा आहे. काही समाजकंटक यात अडथळा आणत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करावी. याबाबत मुख्यमंत्र्यांनीही आश्वासन दिले आहे. किमान यापुढे तरी अशा अनुचित घटना घडू नयेत आणि आपण एकजूट राहायला पाहिजे. अशा कृत्यांमध्ये सहभागी लोकांनाही रोखण्यासाठी आवाहन करणार आहे."
अनेक संघटनांकडून बहिष्कार घालण्याची मागणी कर्नाटकातील हिंदुत्ववादी संघटनांनी शहरातील मंदिरांजवळील मुस्लिम समुदायाच्या लोकांच्या दुकानांवर बंदी घालण्याची, हलाल मांसावर बहिष्कार घालण्याची आणि फळांच्या व्यापारातील मुस्लिमांची मक्तेदारी संपवण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर मशिदींमधील लाऊडस्पीकरवरही कारवाईची मागणी होत आहे. याशिवाय, अनेक संघटनांनी मुस्लिम कारागिरांनी बनवलेल्या मूर्तींवर आणि या समुदायाच्या सदस्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या टॅक्सी आणि ऑटोवर बहिष्कार घालण्याचे आवाहनही केले आहे.