KSRTC Viral Video : कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसच्या चालकाने ड्युटीवर असताना प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यातच थांबवून नमाज पठण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर नव्या वादाला तोंड फुटलं असून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यावर कर्नाटकच्या वाहतूक मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोषी आढळल्यास कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
कर्नाटकातील राज्य परिवहन बसच्या चालकाने नमाज अदा करण्यासाठी रस्त्याच्या कडेला बस थांबवल्याने अडचणीत सापडला आहे. बसचालकाचा नमाज पठण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. व्हिडिओमध्ये, बस रस्त्याच्या कडेला उभी असताना बसचा चालक सीटवर बसून नमाज अदा करताना दिसत आहे. बसमध्ये बसलेले काही प्रवासी हे सर्व असहाय्यपणे पाहत असल्याचे दिसत आहे. काही प्रवाशांनी हा सगळा प्रकार त्यांच्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला होता.
सरकारी बस चालकाने हुबळी-हवेरी रस्त्याच्या कडेला बस थांबवली होती. तो बसच्या प्रवासी सीटवर बसूनच नमाज अदा करु लागला.बसमधील प्रवासी हा सगळा प्रकार पाहत होते. चालक शफिउल्लाह नदाफने नमाज अदा करण्यासाठी रस्त्याच्या कडेला बस थांबवली. प्रवाशांनी याचा या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर मंत्र्यांनीही या प्रकरणाची दखल घेतली.
कर्नाटकचे मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी या सगळ्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली. "२९ एप्रिल रोजी संध्याकाळी हुबळी ते हावेरी दरम्यान जाणाऱ्या बसला थांबवून उत्तर पश्चिम कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या ड्रायव्हर-कम-कंडक्टरने नमाज पठण केल्याचा एक व्हिडिओ मीडियामध्ये व्हायरल झाला. सार्वजनिक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशिष्ट नियम आणि कायदे अनिवार्यपणे पाळावे लागतात. प्रत्येकाला कोणताही धर्म पाळण्याचा अधिकार असला तरी, ते कार्यालयीन वेळेशिवाय असे करू शकतात. बसमध्ये प्रवासी असतानाही, बस मध्यभागी थांबवून नमाज पठण करणे आक्षेपार्ह आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची तात्काळ चौकशी करण्याचे आणि कर्मचारी दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत," असे रामलिंगा रेड्डी यांनी म्हटलं.