कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. बारमध्ये घुसून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी मालावल्ली जिल्ह्यात घडली. हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तीन जण संबंधित तरुणावर चाकूने सपासप वार करताना दिसत आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, बुधवारी संध्याकाळी योगेश हा मगनूर गेटजवळील एका बारमध्ये दारू पिण्यासाठी आला. त्यानंतर आरोपीही तिथे आले. त्यापैकी एकाचे तीन वर्षांपूर्वी योगेशसोबत किरकोळ वादातून भांडण झाले होते. याच गोष्टीवरून त्यांच्या पुन्हा वाद सुरू झाला. त्यानंतर तिन्ही आरोपींनी मिळून योगेशची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी मालावल्ली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.