करमाळा ग्रामपंचायत
By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST
करमाळा : तालुक्यातील मांगी व देवळाली या दोन ग्रामपंचायतीमध्ये माजी आ.शामल बागल व पंचायत समितीचे उपसभापती कल्याणराव गायकवाड यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक ठरलेली असून या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केल्याने निवडणुकीत भलतीच चुरस निर्माण झाली असून या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
करमाळा ग्रामपंचायत
करमाळा : तालुक्यातील मांगी व देवळाली या दोन ग्रामपंचायतीमध्ये माजी आ.शामल बागल व पंचायत समितीचे उपसभापती कल्याणराव गायकवाड यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक ठरलेली असून या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केल्याने निवडणुकीत भलतीच चुरस निर्माण झाली असून या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मांगी ग्रामपंचायतीमध्ये तर गेल्या पंचवीस वर्षांपासून ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोधची परंपरा सुरू होती. दिगंबरराव बागल यांच्या निधनानंतर मांगी गावात तीन वर्षांपासून स्थानिक बागल गटात फूट पडलेली आहे. माजी आ.शामल बागल यांचे चिरंजीव व मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून सोसायटीचे अध्यक्ष देवानंद बागल व बचत गट व ग्रंथपाल संघाचे अध्यक्ष सुचित बागल यांनी स्वतंत्र पॅनल करून माजी आ.बागल यांना यंदा प्रथमच ग्रामपंचायतमध्ये तगडे आव्हान दिले आहे. मांगी ग्रामपंचायतीच्या ३ प्रभागातील एकूण ९ जागांपैकी १ जागा बिनविरोध झाली असून ८ जागांसाठी १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. देवळाली ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा चुरस निर्माण झाली आहे. पंचायत समितीचे उपसभापती व ग्रामपंचायतीवर २० वर्षांपासून एकहाती सत्ता अबाधित ठेवलेले कल्याणराव गायकवाड यांना ग्रामपंचायत निवडणुकीत एकेकाळी त्यांचे समर्थक राहिलेल्यांनी विरोध करून त्यांच्या पॅनल विरोधात लढत दिली आहे. शिवाय त्यांचे पारंपरिक विरोधक चंद्रसेन ननवरे,कानगुडे यांनी गायकवाड त्यांच्या विरोधकांना एकत्रित करून निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. देवळाली ग्रामपंचायतीमधील ५ प्रभागातील १३ जागांसाठी २६ उमेदवार उभे असून या ग्रामपंचायतीमध्ये सरळ व चुरशीची लढत रंगली आहे. (वार्ताहर)