श्रावण महिन्यात, दिल्लीसह देशातील इतर भागांत कावडीयांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे. दरम्यान, शाहदरा येथे काही समाज कंटकांनी अथवा उपद्रवी मंडळींनी कावड यात्रा मार्गावर, सुमारे एक किलोमीटरपर्यंत काचेचे तुकडे टाकल्याचा दावा दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री कपिल मिश्रा यांनी केला आहे. याचवेळी, कावड यात्रेत कुठलीही समस्या येऊ देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.भाजप नेते तथा दिल्लीचे कॅबिनेट मंत्री कपिल मिश्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट केली आहे. यात, ''दिल्लीतील शाहदरा येथे काही समाज कंटकांनी जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत कांवड यात्रा मार्गात काचेचे तुकडे टाकले आहेत. PWD आणि पीडब्ल्यूडी आणि महानगरपालिका कर्मचारी मार्ग स्वच्छ करत आहेत." असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्वतः घेतलीय घटनेची दखल -कपिल मिश्रा पुढे म्हणाले, ''स्थानीय आमदार संजय गोयल तेथे उपस्थित आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्वतः घटनेची दखल घेतली आहे. पीडब्ल्यूडीकडून संबंधित समाज कंटकांविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे. कावड यात्रेत कुठलीही समस्या येऊ देणार नाही.