कानपूरमध्ये एका तरुणाने हुशारीने एका सायबर फसवणूक करणाऱ्याला स्वतःच्या जाळ्यात अडकवलं आणि त्याच्याकडून १०,००० रुपये वसूल केले. फसवणूक करणाऱ्याने सीबीआय अधिकारी असल्याचा दावा करत भूपेंद्रला फोन केला आणि त्याच्यावर अश्लील व्हिडीओ पाहण्याचा आरोप केला आणि केस बंद करण्यासाठी १६,००० रुपयांची मागणी केली.
भूपेंद्रने सतर्कता दाखवत फसवणूक करणाऱ्यालाच त्याच्या जाळ्यात अडकवलं आणि वेगवेगळी कारणं सांगून १०,००० रुपये आपल्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात डीजीपी प्रशांत कुमार आणि उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री असीम अरुण यांनी भूपेंद्रला या धाडसी कामगिरीबद्दल सन्मानित केलं.
सायबर क्राइम टीम लवकरच एक व्हिडीओ जारी करेल, ज्यामध्ये भूपेंद्रने युक्तीत वापरून फसवणूक करणाऱ्यांना कसं अडकवलं हे दाखवलं जाईल. पोलीस आयुक्त अखिल कुमार आणि अतिरिक्त सीपी हरीश चंदर यांनीही भूपेंद्रची भेट घेतली. दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भूपेंद्रशी बोलून सायबर फसवणूक करणाऱ्याला त्याने कसं अडकवलं हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. भूपेंद्रचं खूप कौतुक करण्यात आलं आहे.